लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकाेला, मूर्तिजापूर, अकाेट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र घाेषित केले आहे. या शहरांमध्ये २३ फेब्रुवारीपासून लाॅकडाऊनचे आदेश दिले असून हे आदेश आता ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत. तर ही शहरे वगळता तालुक्यातील इतर गावे तसेच तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यासाठी असलेले निर्बंधही ८ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. या आदेशानुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने आणि प्रतिष्ठाने केवळ सकाळी ८ ते ३ वाजेपर्यंतच तर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता इतर क्षेत्रासाठी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी आणखी एकाचा बळी गेला, तर २६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. काेराेनाची ही गंभीर स्थिती लक्षात घेता प्रशासनाने हे कठाेर पाऊल उचलले आहे.
प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठीचे २३ फेब्रुवारी राेजी दिलेले आदेशच आता ८ मार्चपर्यंत कायम राहणार आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यावर व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. शहरात मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांच्या विराेधात कारवाईचा बडगा उचलला जात असून त्याकरिता पथक गठित करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील निर्बंध कायमच
n सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू.
n ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहील.
n सर्व प्रकारची शासकीय कार्यालये, बँका १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यांपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील.
n सर्व प्रकारची उपाहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा.
n लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना (वधू व वरासह) परवानगी अनुज्ञेय राहील.
n मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी निर्बंध नाहीत.
n चारचाकी गाडीमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर ३ प्रवासी, तीनचाकी गाडी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह २ प्रवासी यांना परवानगी.
n आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीकरिता परवानगी.
n सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील.
n सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील.
n सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.
n सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील.
अकाेला, मूर्तिजापूर, अकाेट, प्रतिबंधित क्षेत्र
n केवळ जीवनाश्यक दुकाने, किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील.
n इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना पूर्ण बंद राहतील.
n सर्व धार्मिक स्थळे ही पूर्णपणे बंद.
n या निर्बंधासाेबतच नाॅन कन्टेन्मेंट झाेनमधील इतर सर्व निर्बंध या तिन्ही शहरांमध्ये लागू राहतील.