अकोला : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून देश ‘लॉकडाउन’ करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने घरातच बसावे असे सक्त निर्देश आहे; मात्र ही संचारबंदी तंतोतंत पाळणे गोरगरिबांच्या वस्त्यांना जड जात आहे. अकोल्यातील अनेक झोपडपट्ट्यांमधील लोकांना नाइलाजाने काही तास तरी घराबाहेर निघावेच लागत आहे. बाहेर कोरोनाची धास्ती, सोबतच पोलिसांच्या दंडुक्याची भीती तर घरात आश्रयासाठी अपुरी जागा या परिस्थितीमुळे घरातच लॉक होणे ही एकप्रकारे शिक्षाच ठरली आहे.अकोल्यात संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. व्यापारी, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापनांचे चाकरमाने आदेशाचे पालन करीत सुट्या घेऊन घरी आहे. कुणाचे घर टोलजंग नसले तरी किमान चार लोकांचा निर्वाह होऊ शकेल इतके सुटसुटीत आहे; मात्र गरीब वस्त्यांमध्ये अशी परिस्थिती नाही. प्रामुख्याने आदी परिसरातील अनेक वस्त्या अत्यंत कोंदट आहेत. रस्ते म्हणजे चिंचोळ्या आणि अरुंद बोळीच आहेत. या गल्लीबोळांच्या काठावर एकमेकांना चिकटलेली घरे आणि त्यात दाटीवाटीने राहणारी कष्टकऱ्यांची कुटुंबे सामान्य परिस्थितीतही मोकळा श्वास घेण्यासाठी तडफडत असतात. आता तर संचारबंदीने घराचे दार लावून आत बसण्याची वेळ आली आहे. दिवसभर मिळेल ते काम करणे आणि रात्री कसाबसा खोलीत आसरा घेणे, यामध्ये त्यांचे आयुष्यच आक्रसून गेले आहे. एकाच कुटुंबात पाच ते सहा सदस्यपाच-सहा जणांचे कुटुंब, त्यात लेकरांचा गलबलाट, तेथेच स्वयंपाक, तेथेच धुणी-भांडी, तेथेच अंथरूण अशी जत्रा. एका छोट्याशा खोली वजाघरात कोंबून टाकलेले हे जीवन सतत बाहेरच्या जगाकडे आशाळभूतपणे बघत असते. बाहेर निघावे तर संचारबंदीचा नियम मोडला जातो अन् पोलिसांचा फटका बसतो. संचारबंदीचे पालनही महत्त्वाचेच अन् या गरिबांचे घराबाहेर निघणेही अपरिहार्यच! त्यामुळे हा कोंडमारा संपण्याची सारेच वाट पाहत आहेत.