‘शास्ती अभय याेजनेचा लाभ घ्या !’
अकाेला: थकीत मालमत्ता करावर दाेन टक्के दंड लागू केला जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने शास्ती अभय याेजना सुरू केली असून, ३१ जुलैपर्यंत कराचा भरणा केल्यास दंडात्मक रकमेतून सूट देण्यात येईल. त्यामुळे उर्वरित तीन दिवसांत नागरिकांनी थकबाकीचा भरणा करून शास्ती याेजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
१०७४ माेकाट श्वानांचे निर्बीजीकरण
अकाेला: शहरात माेकाट श्वानांची माेठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून लहान मुले, महिला व वयाेवृद्ध नागरिकांना घराबाहेर निघणे मुश्कील झाले आहे. यावर उपाय म्हणून मनपा प्रशासनाने आजवर १०७४ श्वानांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे निर्बीजीकरण केले आहे. तसेच त्यांचे लसीकरणही करण्यात आले आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांचा उच्छाद कमी हाेण्यास मदत हाेणार आहे.
हरिनाम सप्ताहाची सांगता
अकाेला: जुने शहरातील विठ्ठल मंदिर येथे ८८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची प्रतीकात्मक शोभयात्रेने सांगता करण्यात आली. जुने शहरातील ३१७ वर्षे पुरातन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ८८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, अखंड वीणा, भजन मंडळाचे कार्यक्रम, वाणीभूषण ज्योतिषाचार्य श्री दत्ता महाराज शास्त्री जोशी यांचे नवनाथ पारायण सप्ताह तसेच भक्तिसंगीत संचाचे कार्यक्रम पार पडले.
साहित्य खरेदीसाठी लगबग
अकाेला: शहरात २१ जुलै राेजी रात्री मुसळधार पावसामुळे सखल भागातील रहिवासी वस्त्यांमध्ये हाहाकार उडाल्याचे चित्र हाेते. त्यांच्या बचाव कार्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाची यंत्रणा कुचकामी ठरली. या विभागातील कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने नव्हती. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षा साहित्याची खरेदी करण्याचे निर्देश दिल्यानंतर अग्निशमन विभागाची लगबग सुरू झाली आहे.
‘मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा !’
अकोला: राज्य शासनाने सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू केल्या आहेत. राज्यात महापालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. परंतु अकोला मनपातील कर्मचाऱ्यांना अद्यापही ७ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला नसून तो तातडीने लागू करण्याची मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी.बी. भातकुले यांनी पत्राद्वारे प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे केली आहे.