अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील मतविभाजनाचे काम वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे केला.अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ अकोल्यात आले असता, शहरातील स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचीत बहुजन आघाडी भाजपाची ‘बी- टीम ’ म्हणून काम करीत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. मोदी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. धर्मांध शक्तीला प्रोत्साहन देण्यात येत असून, सामाजिक तणाव आणि भितीचे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचे सांगत आतंकवादाविरुध्द काही निर्णायक कामे झाली आहेत काय, यासंदर्भात सरकारने उत्तर दिले पाहीजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगीतले. यावेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, अजहर हुसेन, गुलाबराव गावंडे, काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल, माजी महापौर मदन भरगड, साजीदखान पठाण, प्रदीप वखारिया, डॉ.सुभाष कोरपे, डॉ.सुधीर ढोणे, राजेश भारती,तश्वर पटेल उपस्थित होते.
Lok Sabha Election 2019 : आंबेडकरांची उमेदवारी मोदीविरोधी मतांच्या विभाजनासाठीच - पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 6:35 PM