- राजेश शेगोकार अकोला : अकोला हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत १५ वर्षांपासून भाजपाचे संजय धोत्रे खासदार असून, आता ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. या मतदारसंघात २०१४ च्या लढतीची पुनरावृत्ती आहे. काँग्रेसने गेल्यावेळी पराभूत झालेले हिदायत पटेल यांनाच पुन्हा एकदा बोहल्यावर चढविले आहे, तर अॅड. प्रकाश आंबेडकर यावेळी वंचित बहुजन आघाडीचा नवा प्रयोग घेऊन मैदानात आहेत. धोत्रे यांची मतदारसंघावर पकड मजबूत असून, प्रत्येक गावात त्यांचे स्वतंत्र ‘नेटवर्क’ आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व त्यांच्यामध्ये असलेल्या वैमनस्यामुळे पक्षाच्या कामगिरीवर फरक पडलेला नाही, ही त्यांच्या जमेची बाजू आहे; मात्र २०१४ ची मोदी लाट आता नाही. धोत्रे यांच्या विरोधात सुप्त अशी नकारात्मक लाट आहे. त्यामुळेच यावेळी त्यांनी विकासाचा मुद्दा समोर केला आहे. गेल्या तीन दशकांतील निवडणुकांंचा मागोवा घेतला तर भाजपाचा विजय हा मतविभाजनाच्या ‘फॅक्टर’मुळे फारच सुकर होतो, हे अधोरेखित होते. १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यामध्ये आघाडी झाल्याने मतविभाजन टळले व भाजपाला थांबविता आले. यावेळी मतविभाजनाचेच गणित पुन्हा एकदा मांडले जात आहे. अॅड. आंबेडकरांनी दलित, ओबीसी, मुस्लीम, आदिवासी अशा वंचितांचा जागर करीत भारिप-बमसंला थेट वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्याचे धाडस केले आहे, शिवाय एमआयएमला सोबत घेतले आहे. या समीकरणांमुळे काँग्रेसचीच मतपेढी धोक्यात आहे. त्यामुळेच धोत्रे यांना शह देतानाच काँग्रेसला अॅड. आंबेडकर यांच्यावरही मात करायची असल्याने पटेल यांना उमेदवारी देऊन अॅड. आंबेडकरांचीच कोंडी केली आहे. ही कोंडी फोडून मागील मतांच्या तुलनेत त्यांची उडी किती उंच जाते, यावरच त्यांच्या प्रयोगाच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरणार आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ठरणार आहे. खासदार धोत्रे यांनी यावेळी विजय मिळविला तर ते या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा जिंकणारे पहिलेच खासदार ठरतील. अॅड. प्रकाश आंबेडकर जिंकले तर काँग्रेसला सोबत न घेता विजयी होण्याचा विक्रम करतील. हिदायत पटेल विजयी झालेच तर तब्बल तीन दशकांनंतर काँग्रेसला यश मिळेल. त्यामुळे विजय कोणाचाही झाला तरी अकोल्यासाठी विक्रम ठरलेलाच आहे.
आम्ही विकासावर भर दिला आहे. अनेक योजना राबविल्या असून, काही कामे पूर्णत्वास तर काही प्रगतीत आहेत. सिंचन, शेती, रस्ते, पाणी, स्वच्छतेसोबतच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाचीही नाराजी नाही. सर्वांना सोबत घेतले आहे.- संजय धोत्रे, भाजपा.
काँग्रेस-आघाडीसोबत माझी लढतच नाही. भाजपा-शिवसेना युतीसोबत लढाई आहे. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविणाऱ्या भाजपाच्या विरोधात ‘वंचितांनी’ रणशिंग फुंकले आहे. प्रचाराच्या दरम्यान लोकांमधील रोष दिसून येतो. त्यामुळे ही लढाई परिवर्तनाची लढाई आहे.- अॅड. प्रकाश आंबेडकर, ‘वंचित’
- कळीचे मुद्दे
- सलग तिसऱ्यांदा खासदार असल्याने अॅन्टीइन्कम्बन्सी मोडून काढण्यासाठी भाजपा विकासाचा मुद्दा घेऊन रिंगणात आहे.
- काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देऊन अॅड. आंबेडकरांची केलेली कोंडी तर दुसरीकडे ओबीसी, मुस्लिमांचा जागर करण्यावर वंचितचा भर.