- आशिष गावंडे
अकोला: भाजपचे वर्चस्व असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असून, त्याने वेळोवेळी हिंदुत्वाच्या अजेंड्यानुसार भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकल्याचे चित्र दिसून येते.मात्र महापालिकेच्या निवडणुकीपासून या मतदारसंघात भाजप व शिवसेनेतील सूर बिघडले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. एकूणच परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत मताधिक्य टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.लोकसभा मतदारसंघातील अकोला पश्चिम हा भाजपसाठी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. २५ वर्षांचा इतिहास पाहता या विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. गोवर्धन शर्मा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसली तरी त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे लक्षात येते. शिवसेनेचीसुद्धा या मतदारसंघात खोलवर पाळेमुळे रुजल्याची परिस्थिती आहे. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग पश्चिम मतदारसंघात दिसून येतो. २०१४ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता या मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार म्हणूनच आ. गोवर्धन शर्मा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे साहजिकच सेनेच्या मतदाराने भाजपच्या पारड्यात मत टाकले. यंदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची पुन्हा युती झाली असली तरी २०१७ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून भाजप-सेनेचे सूर जुळत नसल्याचे दिसून येते. भाजपकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शिवसेनेची ही नाराजी दूर करून मताधिक्य टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.शिवसेनेला संपविण्याची खेळी!मनपाच्या निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेला संपविण्याची खेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून खेळण्यात आल्याचा सेनेच्या गोटातून आरोप होतो. त्यामध्ये तथ्यही असल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या विरोधात तगडे उमेदवार देणे, त्यांना सर्व प्रकारची रसद पुरवणे, निधी वाटपातून वेळोवेळी डच्चू देणे, सेना नगरसेवकांच्या वाटेला गेलेल्या विकास कामांना खोडा घातल्या जात असल्याचा आरोप सेनेकडून होतो.
आघाडीसमोर अस्तिवाची लढाईअकोला पश्चिम मतदारसंघात २०१४ मधील निवडणुकीचा अपवाद वगळल्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले. या दोन्ही पक्षांची वेळोवेळी आघाडी होत असली, तरी त्याला सुरुंग लावण्याचे काम आजवर भारिप-बहुजन महासंघाने केल्याचे दिसून येते. या मतदारसंघात भारिपच्या स्वतंत्र भूमिकेमुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा होत असल्याचे चित्र आहे. यंदा काँग्रेस-राकाँची आघाडी झाल्यास भाजप-शिवसेना युतीसमोर त्यांची अस्तित्वाची लढाई पाहावयास मिळू शकते.
असे रंगले होते राजकारण२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढले. या लढतीत आ. गोवर्धन शर्मा यांना ६६ हजार ९३४ मते मिळाली, तर सेनेच्या गुलाबराव गावंडे यांना १० हजार ८०० मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयराव देशमुख यांनी मुसंडी मारत २६ हजार ९८१ मते मिळविली. त्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवार उषा विरक यांना १० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. भारिप-बमसंचे उमेदवार आसिफ खान यांना २३ हजार ९२७ मते मिळाली होती.