- राजेश शेगोकारअकोला: परंपरागत दलित मतांसोबत ओबीसीची जोड देत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये एमआयएमचा सहभाग झाल्यानंतर मुस्लीम मतांसाठी वंचित व काँग्रेस आघाडीमध्ये सुरू झालेली स्पर्धा लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देत वंचितची कोंडी केली असून, आपली मतपेढी सांभाळण्यासाठी आता कसरत सुरू केली आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या नऊ निवडणुकांचा आढावा घेतला, तर ज्या-ज्या वेळी काँग्रेसने मुस्लीम किंवा मराठेतर उमेदवार दिला, त्या-त्या वेळी अॅड. आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. १९८९ मध्ये काँग्रेसच्या अझहर हुसेन यांनी आंबेडकरांपेक्षा सहा टक्के अधिक मते मिळाली होती, तर १९९१ ला सुधाकर गणगणे, २००४ मध्ये लक्ष्मणराव तायडे यांनीही आंबेडकरांपेक्षा जास्त मते घेत दुसरा क्रमांक कायम ठेवला होता. या निवडणुकांच्या निकालावरून अल्पसंख्याक व ओबीसी उमेदवार आंबेडकरांना घातक ठरतो, हे सिद्ध होते. त्यामुळे यावेळी काँगे्रसने खेळलेली जुनी खेळी उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखत अॅड. आंबेडकरांनी मुस्लीम समाजातही बैठकांचे सत्र सुरू केले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मुस्लीम समाजाला तर अध्यक्ष पद कुणबी समाजाला देऊन त्यांनी एकाच वेळी काँग्रेस व भाजपा यांच्या मतांवर हात मारण्याचा डाव टाकला आहे. आंबेडकरांचा हाच डाव हाणून पाडण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत मुस्लीम मते आघाडीकडेच कायम राहतील, अशी व्यूहरचना केली आहे. त्यासाठी अल्पसंख्याक आयोगाचे राष्टÑीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही शनिवारपासून दोन दिवस अकोल्यात तळ ठोकून राहणार आहेत. एका सभेसह ते समाजातील प्रमुख लोकांच्या गाठीभेठी घेणार आहेत. १४ एप्रिल रोजी खासदार अॅड. मजीद मेनन हे अकोल्यात येत असून, तेसुद्धा जाहीर सभेसह बैठका घेणार आहेत. अल्पसंख्याक आयोगाचे राष्टÑीय महासचिव जावेद जकारिया यांनी या दौºयाची माहिती दिली असून, या दोन्ही नेत्यांचा भर मुस्लीम मतांचे विभाजन टाळण्यावरच राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ओवेसींची टाळली सभाअॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत खा. ओवेसी हे राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडवित असले तरी आंबेडकरांची राजकीय राजधानी असलेल्या अकोल्यात ते प्रचाराला आले नाहीत. १० एप्रिल रोजी त्यांची प्रस्तावित सभा रद्द करण्यात आली आहे. काँगे्रसने राज्यात केवळ अकोल्यातच मुस्लीम उमेदवार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातच ओवेसींनी प्रचाराला येऊ नये, अशी भूमिका मुस्लीम समाजात असल्यामुळेच ओवेसींनी अकोल्याची सभा टाळल्याची चर्चा आहे. या सभेमुळे वंचितमधील इतर सामाजिक घटक अस्वस्थ होऊ नये, असाही प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.