अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या विरोधातील वातावरण तापविण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा घेण्याबाबत स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना साकडे घातल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अकोटात झालेल्या सभेनंतर काँग्रेसकडून कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांच्या सभेचे आयोजन अद्यापपावेतो केले नसल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात प्रचाराची भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे काँगे्रस-राष्टÑवादी काँग्रेसला फायदा झाला तरी चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले असल्यानेच काँग्रेस आघाडीकडून राज ठाकरे यांच्या सभेसाठी आग्रह सुरू झाला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या ३ दशकांपासून काँग्रेसला स्वबळावर यश मिळाले नाही त्यामुळे काँग्रेस येथे यशासाठी चाचपडत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचा जनाधार वाढविण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे राज ठाकरे यांची सभा उपयुक्त ठरेल, असा होरा असल्यानेच अकोल्यात सभा देण्याबाबत पक्षश्रेष्ठींना साकडे घालण्यात आले आहे.मनसे ला मिळू शकतो बुस्टमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची अकोल्यात सभा झाली तर काँग्र्रेससाठी पोषक आणि मनसेसाठी ‘बुस्ट’ ठरणार आहे. गेल्या आॅक्टोबर महिन्यात ठाकरे अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी कोणतीही सभा घेतली नव्हती; मात्र कार्यकारिणी बरखास्त करून पदाधिकाऱ्यांनाच आरसा दाखविला होता. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने मनसैनिकांमध्येही चैतन्य येऊ शकते.