मूर्तिजापूर (अकोला): मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे हे दुधलम या गावात प्रचारासाठी गेले असता गावातील नागरिकांनी त्यांना घेराव घालून गावाचा रस्ता दुरुस्त केला नाही म्हणून चालते केले. त्यामुळे आल्या पावली परत येण्याची नामुश्की आमदारांवर ओढवली असल्याची जोरदार चर्चा आज तालुक्यात होती.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी तालुक्यातील दुधलम गावात मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे पोहोचले असता गावातील नागरिकांनी एकत्र येऊन आमदारांना अनेक कामांसंदर्भात विचारणा केली. अनभोरा ते दुधलम दरम्यानच्या सहा किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यासंदर्भात आमदार हरीश पिंपळे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मला रस्ता माहीत आहे. तुम्ही दुसरे बोला, असा उलट सवाल गावकऱ्यांना आमदारांनी केला. तेव्हा गावकरी संतापले आणि तुम्ही रस्ता करू शकत नाही, तर आमच्या गावात येण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही आल्या पावली परत जा, असे गावकऱ्यांनी सुचवताच आमदार आल्या पावली परतले. गेल्या अनेक वर्षांपासून अनभोरा, भगोरा दुधलम हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांना अनेक वेळा विनंती गावकऱ्यांनी केली; परंतु खड्डामय झालेल्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर आजचा प्रसंग आल्याचे गावकºयांनी सांगितले. या रस्त्यावरून चालणेसुद्धा कठीण झाले आहे. मूर्तिजापूर शहरात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्या-जाण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत असल्याने शेवटी गावकºयांना टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे, असेही ग्रामस्थ म्हणाले. मी दुधलम गावात प्रचारासाठी गेलो नव्हतो. त्या गावातील आमच्या पक्षाचे पदाधिकारी शंकरराव महल्ले आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. अकोल्यावरून परत येताना दाळंबी मार्गाने त्या गावात गेलो. रस्ता खराब असल्याने मी दाळंबी मार्गाने त्या गावात पोहोचलो, असा गैरसमज नागरिकांचा झाला. सदर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत प्रस्तावित आहे.हरीश पिंपळे, आमदार, मूर्तिजापूर.