अकोला: निवडणूक कोणतीही असो, ती जणू सण, उत्सवासारखी साजरी करण्याची परंपरा आपल्या देशात अव्याहत सुरू आहे आणि यामध्ये घराला घरपण देणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ हिरिरीने सहभागी होऊन लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवारी अॅड.संजय धोत्रे व वंचित बहूजन आघाडीचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या अर्धांगिनी सध्या पायाला भिंगरी लावल्यागत मतदारसंघात फिरत आहेत. हे दोन्ही उमेदवार वकील आहेत. अॅड.आंबेडकर हे वकील आहेत ते अनेकदा कोर्टात उभे राहतात तर धोत्रे यांनी गेल्यावर्षीच वकीलीची पदवी प्राप्त केली आहे. ते अद्याप कोर्टा उभे राहिले नसले तरी गेल्या पंधरा वर्षापासून ते खासदार असल्याने जनतेच्या कोर्टात ते उभे आहेतच त्यामुळे या दोघांच्या प्रचाराची ‘सनद’ त्यांच्या अर्धांगिनी सांभाळत आहेत. सुहासिनीताई व प्रा.अंजलीताई यांच्या प्रचाराची स्टाईल ही हटकेच आहे.
सुहासिनीताई धोत्रे - कॉर्नर बैठका घेण्याला प्राधान्य निवडणूक म्हटली की उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व नातेवाइकांवर अप्रत्यक्ष का होईना, दबाव दिसून येतो. खा. अॅड. संजय धोत्रे यांच्या अर्धांगिनी सुहासिनीताई धोत्रे त्याला अपवाद ठरतात. सकाळी ५ वाजतापासून घरातील कामांची आवरा-आवर केल्यानंतर सकाळी ९ वाजता त्या पूर्वनियोजित दौरा, बैठकीसाठी तयार असतात. चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे प्रसन्न भाव, स्मितहास्य ठेवत त्या भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांसोबत संवाद साधण्यासाठी रवाना होतात. त्यांच्या प्रचाराची स्टाइल जरा हटके व सर्वसामान्यांच्या मनाला भावणारी असल्याचे दिसून येते. सौभाग्याचं लेणं विजयी व्हावं, म्हणून ऐन निवडणुकीच्या काळातच नव्हे तर मागील चार महिन्यांपासून त्या पायाला भिंगरी बांधल्यागत जिल्ह्यातील माता-भगिनींसोबत संवाद साधत असल्याचे चित्र समोर आले आहे. गावागावातील महिला कार्यकर्त्यांना एकत्र करून कॉर्नर बैठका घेण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. दुपारी कोण्यातरी महिला कार्यकर्त्याच्या घरात, हॉलमध्ये उपस्थित महिलांना मार्गदर्शन केल्यानंतर त्याच ठिकाणी घरून सोबत आणलेली जेवणाची शिदोरी सोडण्यात येते आणि त्याच महिलांच्या घोळक्यात पोटात दोन घास ढक लून समाधानाची शिदोरी सोबत घेऊन प्रसन्न मुद्रेने त्या दुसºया गावाच्या प्रवासाला रवाना होतात. यावेळी मंजूषाताई सावरकर त्यांच्या सोबतीला दिसून येतात.रात्री उशिरापर्यंत बैठकामागील चार महिन्यांत जिल्'ातील बहुतांश ग्रामीण व शहरी भाग पिंजून काढल्याचे सुहासिनीताई सांगतात. सायंकाळपर्यंत किमान दोन ते तीन गावांतील महिलांशी संवाद साधल्यानंतर रात्री पुन्हा एखाद्या गावात जाऊन तेथील महिलांना मार्गदर्शन करून सरकारच्या ध्येयधोरणांवर प्रकाशझोत टाकल्या जातो. महिलांच्या गाठीभेटीतून ऊर्जा मिळत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
गावा-गावांत बैठकांमधून प्रबोधन; अंजली आंबेडकर यांचा झंझावात!अकोला लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ त्यांच्या पत्नी प्रा. अंजली आंबेडकर यांनी प्रचार कार्याचे स्वतंत्र नियोजन केले आहे. दररोज मतदारसंघातील सात-आठ गावांमध्ये जाऊन गावातील पक्ष कार्यकर्त्यांसह वेगवेगळ्या समाज घटकांशी संवाद साधत कॉर्नर बैठका घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. गावातील एखाद्या घरात, अंगणात गावातील नागरिकांच्या बैठका घेत, वेगवेगळ्या मुद्यांवर प्रबोधन करून महिला-पुरुषांसोबत संवाद साधून स्थानिक प्रश्न आणि अडचणीसंदर्भात चर्चा करीत असल्याचे प्रा. अंजली आंबेडकर यांनी सांगितले. साहेबांच्या निवडणूक प्रचारासाठी १६ एप्रिलपर्यंत गावा-गावांत कॉर्नर बैठका, सभा आणि विविध कार्यक्रमांचे स्वतंत्र नियोजन केले आहे, असे त्या म्हणाल्या.
अंजलीतार्इंचा असा आहे दिनक्रम; दुपारचे जेवण कार्यकर्त्यांच्या घरी!निवडणूक प्रचार कार्याच्या लगबगीत प्रा. अंजली आंबेडकर दररोज सकाळी ९ वाजता घराबाहेर पडतात. दिवसभरात नियोजित सात-आठ गावांमध्ये जाऊन पक्ष कार्यकर्त्यांसह वेगवेगळ्या समाजातील नागरिकांसोबत संवाद साधतात. महिला-पुरुषांच्या कॉर्नर बैठका घेऊन प्रबोधन करीत आहेत. एखाद्या गावात पक्ष कार्यकर्त्यांच्या घरी दुपारचे जेवण आटोपून पुढच्या गावात बैठकांसाठी मार्गस्थ होतात. प्रचार कार्य आटोपून रात्रीचे जेवण त्या अकोल्यातील स्वत:च्या घरी करतात. कार्यकर्ते खूप काळजी घेतात, असे प्रा. अंजली आंबेडकर यांनी सांगितले.