नितीन गव्हाळे, अकोला: अकोला लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीचा मतमोजणी एक ते दीड तासाचा अवधी असल्याने या पहिल्या फेरी कोणता उमेदवार आघाडी मिळवतो याविषयीची उत्कंठा वाढलेली आहे.
एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्रावर जिल्हा प्रशासनाने जयत तयारी केली असून अधिकाऱ्यांमार्फत विधानसभा क्षेत्र निहाय मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर रिंगणात उभे आहेत. यंदाची लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याची शक्यता निकालाच्या आधीपासूनच वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडी मिळवतो आणि ती आघाडी किती मतांची असेल याविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली असून सकाळी आठ वाजता पासूनच विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मतमोजणी केंद्राकडे धाव घेत आहेत.