अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. अकोल्यातील मंगरुळपीर रोडवरील खदानस्थित शासकीय गोदामात ८४ टेबलवर मतमोजणी होणार असून, जिल्हा प्रशासनामार्फत मतमोजणी प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले असून, निवडणूक लढविलेल्या ११ उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) सीलबंद झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी अकोला शहरातील मंगरुळपीर रोडवरील खदानस्थित शासकीय गोदामात होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, बाळापूर, मूर्तिजापूर व रिसोड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची १४ टेबल या प्रमाणे अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी एकूण ८४ टेबलवर होणार आहे. तसेच ‘पोस्टल बॅलेट’ची मतमोजणी सहा टेबलवर होणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मतमोजणी प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांची तयारी संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आली आहे.मतमोजणी प्रतिनिधींच्या नेमणुकीसाठी मागविले अर्ज!मतमोजणीची प्रक्रिया उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानुषंगाने मतमोजणी प्रतिनिधींच्या नेमणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागामार्फत अकोला लोकसभा मतदारसंघातील ११ उमेदवारांकडून नमुना क्र.१८ चे अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झालेल्या व्यक्तींची मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. मतमोजणी होणाऱ्या ८४ टेबलवर उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येणार आहे.