अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथील वाहनतळाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या सोमवार, २७ मेपासून बॅडमिंटन, स्वीमिंग व बास्केटबॉलच्या खेळाडूंसाठी बहूद्देशीय हॉलच्या बाजूने आणि इतर सर्व क्रीडा प्रकाराच्या खेळाडू व नागरिकांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासमोरील बाजूने पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे सूचना फलक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मैदानात लावण्यात आले आहेत. सोमवारपासून या सूचनेची अंमलबजावणी होईल, अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी ‘लोकमत’सोबत संवाद साधताना दिली.रविवारच्या अंकात ‘लोकमत’ने ‘वसंत देसाई क्रीडांगणाची ‘पार्किंग’ समस्या कायम!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने गांर्भीयाने घेऊन खेळाडूंना पार्किंग संबंधित असलेली समस्येचे तत्काळ निरसन केले. वसंत देसाई क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात खेळाडू व नागरिक व्यायामासाठी येतात. क्रीडांगणात पार्किंग सुविधा नसल्याने क्रीडांगणाच्या पूर्वकडील बाजूला दुचाकी व चारचाकी वाहने उभे केल्या जाते. परिणामी, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा होत होता. मैदानातील आतील भागातही वाहने शिस्तीत लावल्या जात नसल्याने खेळाडूंना क्रीडांगणात प्रवेशासाठी अडथळा येत होता.क्रीडांगणाच्या पश्चिम व दक्षिणेकडील भागात अतिक्रमण झालेले आहे. यामुळे या दोन्ही बाजंूनी पार्किंग होऊ शकत नाही. शिवाय, मुख्य प्रवेशद्वारासमोर रात्री ट्रक व लक्झरी बस उभ्या राहतात. पूर्वेकडील बाजूने क्रीडांगणावर येणाºया लोकांच्या गाड्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजंूनी अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या राहतात. परिणामी, बॅडमिंटन हॉल व जलतरण तलावाकडे जाणाऱ्यांना अडथळा निर्माण होते. यासाठी क्रीडा विभागाने आता खबरदारीचे पाऊल उचलले आहे. ८ मे रोजी दोन्ही छोट्या प्रवेशद्वारांवर एक सूचना लावावी की, ‘१५ मेपासून पार्किंग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या बाजूने राहील’, असे खेळाडूंनी क्रीडा अधिकाºयांना सुचविले होते; मात्र एवढे असूनसुद्धा क्रीडा कार्यालयाने काहीच कारवाई केली नव्हती. याशिवाय बॅडमिंटन हॉल, तरणतलाव, बास्केटबॉल मैदान परिसरातील मोकळ्या जागेतही गाड्या लावल्या जातात. एखादी अप्रिय घटना घडल्यास अॅम्ब्युलन्सला आत येण्यासाठीसुद्धा जागा नाही. यासाठी मैदानात येणाºया लोकांसाठी पार्किंग दुसºया प्रवेशद्वाराने करावी, अशी मागणी खेळाडूंनी केली होती. खेळाडूंनी केलेल्या या मागणीची पूर्तता केली असून, सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. यासाठी खेळाडू व नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.