Loksabha Election 2019 : दावा सर्वांचाच; कौल कोणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 02:49 PM2019-05-14T14:49:40+5:302019-05-14T14:50:20+5:30
या निवडणुकीचे निकाल वेगळे असतील, असे दावे सर्वच दावेदारांकडून केले जात आहेत.
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा, काँग्रेस व प्रथमच रिंगणात असलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये तिरंगी सामना होत आहे. २०१४ च्या निवडणुकीतील तेच प्रतिस्पर्धी पुन्हा नव्याने यावेळी समोर असले तरी यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बमसंचा विस्तार केला आहे, त्यामुळे या निवडणुकीचे निकाल वेगळे असतील, असे दावे सर्वच दावेदारांकडून केले जात आहेत.
यामध्ये १ लक्ष ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे २०१४ च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण १६ लक्ष ६९ हजार ८६१ मतदारांपैकी ९ लक्ष ७२ हजार २८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी एकूण ५८.२२ टक्के मतदान झाले होते. यंदा १८ लक्ष ६१ हजार ७३९ मतदारांपैकी ११ लक्ष १६ हजार ७६३ मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला. यावेळी ६० टक्के मतदान झाले असून, गतवेळच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. एकूणच, २०१४ मधील निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मधील निवडणुकीत १ लक्ष ९१ हजार ८७८ नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, यापैकी तब्बल १ लक्ष ४४ हजार ४७८ मतदारांनी मतांचे दान केल्याचे समोर आले आहे. ही वाढीव टक्केवारी खासदार अॅड. संजय धोत्रे, काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल तसेच वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर या तिघांपैकी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, याची आकडेमोड समर्थकांकडून सुरूच आहे.