लोणार : दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने गत काही वर्षात शासकीय शाळांची विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर घसरलेली आहे. मात्र याला शहरातील नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा, उर्दू प्राथमिक कन्या शाळा तसेच उर्दू पूर्व माध्यमिक शाळा अपवाद ठरली ठरली आहे. नगराध्यक्ष भूषण मापारी व उपनगराध्यक्ष साफियाबी बेगम नूर महमंद खान यांनी गत दोन वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नामुळे नगरपरिषद शाळा डिजिटल झाल्या असून शहरातील कॉन्व्हेंट मधील अनेक विद्यार्थी यावर्षी न.प. शाळेत परतले आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील शिक्षण व सुविधा दर्जेदार नसल्याची बहुतांश पालकवर्गाची मानसिकता आहे. परिणामी शहरी भागातील खासगी शाळा किंवा नजीकच्या कॉन्व्हेंटमध्ये पाल्याला प्रवेश देण्याकडे पालकांचा कल राहतो. याला लोणार नगर परिषद शाळा अपवाद ठरल्या आहेत. या शाळेत पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहेत. नगराध्यक्ष भूषण मापारी, उपनगराध्यक्ष साफियाबी बेगम नूर महमंद खान तसेच माजी शिक्षण सभापती शेख समद शेख अहमद यांनी शाळेचा कायापालट करण्यासाठी प्रथम मुख्याध्यापक, शिक्षक यांची बैठक घेऊन डिजिटल शाळेची संकल्पना मांडली. डिजिटल शाळा व शिकवण्याची पद्धत शिक्षकांना आवडल्यामुळे त्यांनी शाळेत करण्यात येणाºया नवबदलात सहभागी होत चांगली मेहनत घेतली. त्यांनीही विद्यार्थांच्या पालकांना माहिती देवून शाळेतील भौतिक व शाळेतील सुविधेची माहिती दिली. मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. शासनाच्या निधीसोबत पालक, शिक्षक यांच्या सहकायार्तून लोकवर्गणी केली आणि निधी उभारला. या निधीतून वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या. विद्यार्थांचे सामान्य ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारली आहे. तसेच प्रत्येक वर्ग खोलीत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क बेंच लावण्यात आले आहेत. वर्ग खोलीसह शाळा परिसर विविध माहिती, सुविचार, थोर व्यक्तींची माहिती सह सुशोभित करण्यात आला आहे. याबाबत पालकांमध्ये जागृती व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची शाळेकडे ओढ वाढावी, यासाठी १३ आॅगस्ट रोजी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गटनेते शांतीलाल गुगलीया, शहराध्यक्ष नितीन शिंदे, साहेबराव पाटोळे, अ.उबेद अ.मुनाफ, एजाज खान, गोपाल तोष्णीवाल, इमरान खान, रिजवान हाजी, प्रशासक सतीश कापुरे, न.प.कर्मचारी नेमाडे, जावेद भाई , अजीम शेख यांचेसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणार नगर परिषद शाळा झाल्या डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 6:16 PM