अकोला: राज्यभर शिक्षणाच्या खासगीकरणातून बाजारीकरण झाले आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणातून हत्येसारखे गंभीर गुन्हे होत आहे. काही खासगी शिकवणी वर्गाच्या आड मुलींचे लैंगिक शोषण होत आहे. महाविद्यालय-शाळा आता फक्त नावापुरतेच उरलेले आहेत. शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण मोडीत काढून शंभर टक्के बाजारीकरण सुरू झाले आहे. शिकवणी शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक लूट कथित शिक्षणसम्राट करीत असल्याचा आरोप शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी केला.शनिवारी स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अविनाश खापे यांनी आजची शिक्षण पद्धती आणि सुशिक्षित बेरोजगारावर ताशेरे ओढले. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण आणि आर्थिक दुर्बल घटकातील सर्वसामान्य लोकांसाठी जिल्हा परिषद, मनपाच्या शाळा आणि त्यांच्यासाठी एसएससी, एचएससी बोर्ड असते. मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांसाठी कॉन्व्हेंट शाळा त्यांच्यासाठी सीबीएससी आणि आयसीएसई बोर्ड तसेच अति श्रीमंत आणि कोट्यधीशांच्या मुलांसाठी आॅक्सफर्ड पॅटर्न असा शिक्षण व्यवस्थेत आज भेदभाव केला जात आहे. सर्वांसाठी समान शिक्षण पद्धती अवलंबिली पाहिजे, असे खापे म्हणाले.सुशिक्षित बेरोजगारीला आळा घालण्यासाठी व्यवसाय शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच पाहिजे तो व्यवसाय करण्यासाठी विना तारण कर्ज सुशिक्षित तरुणांना दिले पाहिजे. कृषिपूरक आणि पर्यावरणपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देऊन त्यांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. उद्योगांना लावलेल्या जाचक अटी लावून मोठे उद्योग-मोठी कर्जे देऊन मोठ्याच लोकांच्या घशात पैसा घालण्यापेक्षा उद्योगांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात एम्प्लॉयमेंट आॅफिस आहेत. मग कि ती बेरोजगारांना रोजगार दिला गेला? की हे कार्यालय फक्त आता नावालाच उरलेले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांची क्रयशक्ती संपण्याच्या आधी जर सरकार रोजगार, व्यवसाय आणि नोकरी देऊ शकत नसेल तर बेरोजगार तरुणांना रोजगार भत्ता दिला गेला पाहिजे, असेदेखील खापे यांनी सांगितले.