ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 16 - मुस्लीम समाजाला भेडसावणाºया प्रश्नांची उकल न करता जाहीर सभांमधून केवळ विखारी प्रचार करण्याचे काम एमआयएमच्या दोन्ही उच्चशिक्षीत ओवेसी बंधूंनी सुरू केले आहे. ओवेसी बंधूंच्या कार्यशैलीमुळे मुस्लीम समाजाचे नुकसान होत असल्याचे टिकास्त्र राकाँचे खासदार अॅड.माजीद मेमन यांनी सोडले. गुरुवारी मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील दहा महापालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल दमदार राहील. मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये वाक्युध्द रंगले असून कालपर्यंत गळ्यात गळे घालून सत्तेची फळे चाखणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे एकमेकांचे जाहीर सभांमधून वाभाडे काढत असल्याची टिका खा.अॅड.माजीद मेमन यांनी केली. राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेला सर्वसामान्य जनतेचा विसर पडला असून कोण खरा व कोण खोटा हे सिध्द करण्याची जणू स्पर्धाच रंगली असल्याचे अॅड.मेमन यावेळी म्हणाले. सत्ताधाºयांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात असून ‘अच्छे दिन’च्या वल्गना कधीच्याच हवेत विरल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मतदार राजा राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती देणार असून विकासाच्या मुद्यांवरच पक्ष निवडणूक लढवत असल्याचे अॅड.मेमन यांनी स्पष्ट केले. ‘ट्रिपल’तलाकच्या मुद्यावर केंद्र सरकारने मुस्लीम समाजातील महिलांच्या भावना समजून घ्याव्यात. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र त्यापूर्वी महिलांची मते विचारात घेऊन केेंद्र सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा,असेही अॅड.मेमन यांनी सांगितले.