- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या आश्रित मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे; मात्र आई-वडिलांचे छत्र हरविले ...घर नसल्याने राहण्याची सोय नाही ...त्यामुळे जाणार तरी कुठे आणि पोटाची खळगी भरायची तरी कशी, याबाबतची चिंता ‘लॉकडाउन’मध्ये अकोल्यात अडकलेल्या जळगाव खान्देश येथील १८ वर्षीय अनाथ ‘करण’ला सतावत आहे.जळगाव खान्देश येथील एमआयडीसीच्या परिसरातील रहिवासी करण शंकरसिंह ठाकूर इयत्ता पाचवीत असतानाच आई-वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर काही दिवस करण आजीसोबत राहत होता. इयत्ता दहावी अनुत्तीर्ण झाल्यानंतर काम करून पोट भरण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू झाला. अकोल्यातील एका हॉटेलमध्ये काम करीत असतानाच, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाउन’ लागू झाले. त्यामुळे हॉटेल बंद झाल्याने, हाताला काम नसल्याच्या स्थितीत अनाथ करण आश्रयासाठी आणि पोटाची खळगी भरण्याकरिता धडपड करीत असताना, दीड महिन्यांपूर्वी अकोल्यात आलेल्या मेंढपालांसोबत गांधीग्रामकडे गेला होता; मात्र तेथून मेंढपाळ पुढे निघून गेले आणि करण मागे राहिल्याने, सरपंचांनी त्याला तहसीलदारांकडे आणून सोडले. ‘लॉकडाउन’मध्ये अकोल्यात अडकलेल्या मध्य प्रदेशातील ६० मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासनामार्फत अकोल्यातील खडकी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहूद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील आश्रित मजुरांना ७ एप्रिल रोजी त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. आई-वडिलांचे छत्र नसलेल्या आणि राहण्यासाठी घरही नसल्याच्या स्थितीत ‘करण’ कुठे जाणार, असा प्रश्न प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोरही निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरूपात अनाथ करणच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठातील कॅन्टीन चालक शेषराव काळे यांच्यामार्फत कॅन्टीनमध्ये करण्यात आली आहे.
काम करून पोट भरणार!आई-वडील नाहीत. घर नसल्याने राहण्याची सोय नाही. त्यामुळे इकडेच कुठेही राहून आणि काम करून पोटाची खळगी भरणार आहे, असे करण ठाकूर याने सांगितले.
सध्या ‘करण’च्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठातील काळे यांच्या कॅन्टीनमध्ये करण्यात आली आहे. लवकरच करणला रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. - डॉ. नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, अकोला.