अकोला: महानगरपालिकेने शहरातील हॉटेल्सच्या स्वयंपाकगृहात अस्वच्छता असल्यामुळे सील लावल्याने संतप्त झालेल्या हॉटेल व्यावसायिक व स्वीट मार्ट दुकानदारांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. दुपारी १ वाजता खाद्य, पेय विक्रेता संघाच्यावतीने निवासी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन मनपाच्या कारभारावर व्यावसायिकांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच मनपाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खाद्य, पेय विक्रेता संघाने दिला आहे. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, हॉटेलमध्ये साफसफाई नसेल तर हॉटेलची तपासणी करून दंड करण्याचा अधिकार मनपा अधिकार्यांना आहे. मात्र, हॉटेल सील करण्याचा अधिकार मनपाला नाही. मनपा उपायुक्तांनी ६ ऑगस्ट रोजी शहरातील ६ हॉटेल्सला सील लावून ५0 हजार रुपये दंड ठोठावला. ही कारवाई अयोग्य व गैरकायदेशीर आहे. ही कारवाई व्यावसायिकांना त्रास देण्यासाठी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे व्यापार्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी बंद पुकारला असून, त्वरित हॉटेल्सला लावलेले सील उघडण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ओमप्रकाश गोयनका, किरण शहा, मनोज शहा, योगेश अग्रवाल, आनंद अग्रवाल, अशोक डाखरे, नीलेश निनोरे, हितेश वखारिया, भरत केजडीवाल, योगेश माहोरे, हरीश टोंगळे, अखिलेश पारिका, रामदास पारिका, दीपक अग्रवाल, संजय केजरीवाल यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते. हॉटेल व्यवसायिक नियमांचे पालन करीत नसतील, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यास हरकत नाही; मात्र मनपा प्रशासन अतिरेकी कारवाई करीत असल्याचा आरोप यावेळी व्यवसायिकांनी केला. उपायुक्त चिंचोलकर यांनी हॉटेल्सला सील ठोकले; मात्र सर्व नियमांचे पालन करून हॉटेल व्यवसायिकांनी सील उघडण्याची मागणी महापालिकेकडे करण्याचा प्रयत्न केला असता, उपायुक्तांचा मोबाईल फोन शुक्रवारी, दिवसभर बंद असल्याचे आढळले. ही बाब योग्य नसल्याचे गार्हाणे व्यवसायिकांनी यावेळी मांडले.दरम्यान, हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळली तर मनपाला २0 ते २00 रुपये दंड करण्याचा अधिकार आहे. मनपा आयुक्तांनी महासभेत एक हजार ते पाच हजार रुपये दंड ठोठावण्याची परवानगी घेतली. मात्र, मनपा हॉटेलला सील ठोकून ५0 हजार ते १ लाख रुपये दंड ठोठावत आहे. हे बेकायदेशीर आहे. मनपाने हॉटेल व्यावसायिकांवर कायद्यानुसार कारवाई करायला हवी. मात्र उपायुक्तांनी हॉटेलला सील ठोकून महासभेचा, मनपा अधिनियमनाचा व कायद्याचा अपमान केला आहे. मनपाने हॉटेलला लावलेले सील त्वरित उघडले नाही तर आपण स्वत: सील तोडणार असल्याचा इशारा माजी महापौर व काँग्रेसचे शहर अध्यक्ष मदन भरगड यांनी दिला आहे.
अकोला मनपाविरोधात हॉटेल व्यावसायिकांचे तीव्र आंदोलन
By admin | Published: August 09, 2014 1:53 AM