अकोला : यंदाच्या पावसाळ्यात भरपूरपाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
यावर्षीच्या पावसाळ्यात खूप अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पावसाळ्यात जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रासह नदी व नाल्याकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिताचा संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजनांची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे, तसेच जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील नदी व नाल्याकाठच्या गावांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
जिल्ह्यातील नद्या : १३
नदीशेजारी गावे : ७७
पूरबाधित होणारी तालुके : ०७
पर्जन्यमानाची सरासरी
६९७.३ मि.मी.
प्रशासनाची काय तयारी?
फायर फायटर : ०८
रेस्क्यू व्हॅन : ०१
रबर बोटी : ०२
लाइफ जॅकेट : ७०
कटर : ०४
पूरबाधित क्षेत्र
जिल्ह्यात पुरामुळे बाधित होणारी ७७ गावे आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यात म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बु. व कुरणखेड. बार्शिटाकळी तालुक्यात चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खुर्द, टाकळी, राजंदा, सुकळी, सिंदखेड, अकोट तालुक्यात केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी, वरूर, तेल्हारा तालुक्यात मनात्री बु., डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळंवद, दानापूर, सौंदळा, वारखेड. बाळापूर तालुक्यात वाडेगाव, बाभूळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा व हातरुण. पातूर तालुक्यात पास्टूल, भंडारज खुर्द, आगिखेड, कोठारी बु., चोंढी, विवरा, आलेगाव, वाहाळा बु., सस्ती व तुलंगा. मूर्तिजापूर तालुक्यात हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापुरा, हिवरा कोरडे, लाखपुरी, माना, खांदला, पोही व उनखेड इत्यादी पूरबाधित गावांचा समावेश आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यातील नदी व नाल्याकाठच्या पूरबाधित गावांमध्ये संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना यंत्रणांना दिले आहेत, तसेच जिल्हा व जिल्ह्यातील तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला