बाश्रीटाकळी : नजीकच्या पुनोती बु. गावातील तंटामुक्त ग्राम समितीने गावात अवैध दारूविक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, एका दारू विक्रेत्याने ती धाब्यावर बसवित मंगळवारी स्थानिक ग्रामपंचायत भवनासमोर चक्क गावठी दारू गाळण्याची भट्टी लावली, तर दुसर्या अवैध दारू विक्रेत्याने शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत लाऊडस्पीकरवरून अवैध दारू त्याच्याकडेच मिळेल, अशी जाहिरात केली आहे. या दोन्ही घटनांमुळे पुनोती बु. येथे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचे दिसून येत आहे. पुनोती बु. गावात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तंटामुक्त ग्राम समितीने गावात अवैध दारूविक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला. काही दारू विक्रेत्यांनी हा निर्णय मान्य केला. मात्र, काही दारू विक्रेत्यांनी सदर निर्णय झुगारून लावत अवैध दारू विक्री सुरूच ठेवली. मागील आठवड्यात गावातील सरपंच अमोल काकड, पोलीस पाटील अनंता गाडगे, सामाजिक कार्यकर्ते देवराव वजाडे व तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रामचवरे आदी पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक घनश्याम पाटील यांना भेटून गावात अवैध दारूविक्री बंद करण्याची विनंती केली. पोलिसांनी त्याची तत्काळ दखल घेत पुनोती बु. येथे छापा मारून अवैध दारू विक्रेता दिलीप देवकुणबी यास अवैध दारू विक्री करताना पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली होती.त्यानंतर शनिवारी पुनोती येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवरील लाऊडस्पीकरवरून एका दारू विक्रेत्याने ह्यअवैध दारू पुनोती बु.मध्ये फक्त आपल्याकडेच विकत मिळेल, अशा शब्दात अवैध दारूची जाहिरात केली. या घटनेला दोन दिवस उलटून जात नाही, तोच दुसर्या दारू विक्रेत्याने मंगळवारी सायंकाळी पुनोती बु.च्या ग्रा.पं.भवनासमोर गावठी दारूची भट्टी पेटविली. त्यावेळी गावातील २00 लोक तेथे जमले होते. गावातील प्रमुख लोकांनी या घटनेबाबत संबंधित बिट जमादाराला माहिती दिली. या घटनेमुळे पुनोतीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.
लाऊडस्पिकरवरून केली अवैध दारू विक्रीची जाहिरात!
By admin | Published: October 01, 2015 2:22 AM