हिवरखेड : प्रेम खरेच आंधळे असते. प्रेमाला वयाचे बंधन नसते. कोणत्याही वयात आणि कोणाशी प्रेम होऊ शकते. हे पुन्हा हिवरखेडातील घटनेमुळे सिद्ध झाले आहे. हिवरखेड परिसरातील वयाची चाळिशी उलटलेले एक प्रेमी युगुल समाज, कुटुंब, प्रतिष्ठेची तमा न बाळगता पळून गेले. विशेष पळून गेलेले दोघेही विवाहित आहेत. त्यांना मुलेबाळे आहेत; परंतु त्याचीही तमा न बाळगता, त्यांनी पलायन केले. त्यांच्या पलायनाची हिवरखेड परिसरात खमंग चर्चा रंगत आहे. दोघांच्याही कुटुंबावर तोंड लपविण्याची नामुष्की ओढवली आहे.हिवरखेड परिसरातील एक प्रेमी युगल २९ जूनच्या संध्याकाळी पलायन करून हिवरखेड पोलीस ठाण्यात आले होते. या प्रेमी युगुलाने आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला आता उर्वरित आयुष्य एकमेकांच्या सोबत काढायचे आहे; परंतु नातेवाईक आम्हाला सोबत राहू देत नाही.असे स्पष्ट केले. प्रेयसीने नवरा, सासू, सासरे व चार अपत्य आहेत; परंतु माझे मन फक्त प्रियकरासोबत गुंतले आहे. त्यामुळे मी उर्वरित आयुष्य प्रियकरासोबतच घालविण्याचा निर्णय घेतला आहे, असे पोलिसांना सांगितले तर ४२ वर्षीय प्रियकरानेसुद्धा पत्नी व ३ अपत्य आहेत. असे असतानाही माझे प्रेयसीवर जिवापाड प्रेम आहे. त्यामुळे मलासुद्धा तिच्यासोबत उर्वरित आयुष्य घालवायचे आहे, असे सांगितले. त्यावर पोलीस चक्रावून गेले. या प्रकरणात करावे तरी काय, असा प्रश्न पोलिसांना पडला. पोलिसांनी दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलाने कोणाचेही ऐकले नाही. पळून आलेल्या प्रेमी युगुलाने स्वत:च्या वयाचा, मुलांचा, कुटुंबाचा काही विचार केला नाही. समाज काय म्हणेल, याचाही विचार केला नाही. प्रेमात आंधळे होत, दोघांनी पुढील आयुष्य सोबत घालविण्याचा परस्पर निर्णय घेतला; परंतु त्यांच्या या निर्णयामुळे दोन्ही कुटुंब हादरून गेले आहेत. (प्रतिनिधी)