- राजरत्न सिरसाट (अकोला)
भाजीपाला, फळे जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये ते विक्री करावे लागतात. याच अनुषंगाने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बाष्पकीय शीतक साठवणगृह विकसित केले आहे.
सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या शीतगृहाला दोन एकेरी विटेच्या भिंती बांधल्या असून, त्यामध्ये एक विटेची पोकळी ठेवली आहे. त्याच पोकळीमध्ये विटांचे जाड तुकडे टाकले आहेत. एकेरी विटांची भिंत बांधताना दोन लगतच्या विटांमध्ये ५ ते ४ सें.मी. एवढे अंतर सोडले आहे. जेणेकरू न भिंतीभर हवा खेळती राहावी. भिंत पूर्ण बांधल्यानंतर २० मि.मी. व्यासाचा पीव्हीसी पाईप, त्यावर २ मि.मी.ची छिद्रे करू न दोन एकेरी विटेच्या मधील पोकळी ज्यामध्ये विटांचे तुकडे भरले आहेत, त्यावर ठेवून तोे पाण्याच्या टाकीला जोडला जातो.
या पाईपद्वारे पाणी भिंतीवर सकाळ, दुपार व संध्याकाळी सोडून संपूर्ण भिंत ओली ठेवल्यास बाहेरील भिंतीमधून आतमध्ये येणारी हवा थंड असते. यामुळे अल्पकाळासाठी फळे, भाजीपाला साठवता येतो. विशेष म्हणजे या शीतगृहाची क्षमता संत्राफळासाठी ४ टनापर्यंत आहे. ही पद्धत हाताळण्यास सोपी, सुलभ व शीतगृहाच्या तुलनेत कमी खर्चाची आहे. शीतकालीन तापमान बाहेरील तापमानापेक्षा १४ ते १८ डिग्री सेल्सिअसने कमी आणि सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के मिळते. उन्हाळ्यात संत्र्याची साठवणूक केली असता साधारणत: २० ते २१ दिवस संत्रा चांगला टिकाऊ स्थितीत राहतो.
हे शीतगृह शेतात, बाजारात इत्यादी ठिकाणी बांधता येते. कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेले बाष्पकीय शीतगृहाचा आकार आवश्यकतेनुसार कमी-जास्त करता येतो.