अकोला: वर्हाडातील बहुतांश धरणांमध्ये यावर्षी अल्प जलसाठा असून, ५0 टक्कय़ांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधील पाणी यावर्षी सिंचनासाठी सोडण्यात येणार नसल्याचे वृत्त असल्याने, यावर्षी रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.वर्हाडातील अमरावती वगळता अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या उर्वरित चार जिल्हय़ांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, चारही जिल्हय़ांमधील धरणांच्या पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. त्यातही अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये तर फार कमी पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी सर्वप्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिल्या जाणार आहे. अकोला जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम व इतर लघू प्रकल्पांची सिंचन क्षमता ३१ हजार हेक्टर एवढी आहे. काटेपूर्णा या मोठय़ा धरणांतर्गत जिल्हय़ातील सर्वाधिक ८,३२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे; परंतु या धरणात आजमितीस केवळ ३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिल्हय़ात जलसंपदा विभागाने यंदा केवळ तीन हजार हेक्टरचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या मोठय़ा धरणात ५८ टक्के जलसाठा आहे. त्या धरणातील पाणी सिंचनासाठी द्यायचे की नाही, हा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार आहे. वाशिम जिल्हय़ातील प्रकल्प छोटे आहेत. त्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षा थोडा अधिक जलसाठा असला तरी, छोट्या धरणांमधील पाणी अग्रक्रमाने पिण्यासाठी राखून ठेवल्या जाणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असल्याने, धरणांमधील साठा व जिल्हय़ातील पिण्याच्या पाण्याचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, असे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता रा. वि. जलतार यांनी स्पष्ट केले. * मंगळवारी ठरणार पाण्याचे आरक्षण अकोला जिल्हय़ातील धरणांच्या जलपातळीचा आढावा व आरक्षणासंदर्भात, ११नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेत शिल्लक जलसाठय़ाचा आढावा घेऊन, सिंचनाचा निर्णय घेतला जाणार आहे.
व-हाडातील धरणांमध्ये अल्प जलसाठा!
By admin | Published: November 08, 2014 11:25 PM