बुलडाणा: नातेसंबंधात चुलत दीर व भावजय असल्यामुळे लग्नाला कुटुंबीयांचा विरोध व एकत्र येऊ शकत नसल्याच्या भीतीमुळे एका प्रेमी युगुलाने झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरापासून जवळच बुलडाणा-चिखली मार्गावरील चौधरी पेट्रोल पंपासमोर १६ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने र्मग दाखल केला आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील संदीप जाधव व कासाबाई जाधव रा. सागवन यांचे २00५ मध्ये लग्न झाले होते. दरम्यान, त्यांना ११ वर्षांची मुलगी व ४ वर्षांंचा मुलगा झाला; मात्र संसार सुरू असताना गावातीलच गजानन गणपत उबाळे (वय २८) व कासाबाई जाधव (वय ३५) यांचे अवैध प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून कासाबाई व पती संदीप यांच्यात भांडणे होऊ लागली. त्यातच सासरी छळ होत असल्याचा आरोप करून कासाबाई माहेरी सागवान येथे राहण्यासाठी आली होती. याबाबत कासाबाईने सासरच्या विरुद्ध छळ होत असल्याची तक्रार धामणगाव बढे पोलिसांकडे केली होती. तेव्हापासून कासाबाई माहेरी राहत होती. तसेच घटस्फोटासाठी प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. दरम्यानच्या काळात गजानन उबाळे व कासाबाई जाधव यांचा मोबाइलद्वारे संपर्क सुरू होता. घटनेच्या पूर्वसंध्येला गजानन उबाळे याने काही प्रवाशांना बुलडाण्यात सोडायचे आहे म्हणून कार घेऊन जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. संध्याकाळी बुलडाणा येथे आल्यावर गजानन उबाळे याने मोबाइलद्वारे कासाबाईशी संपर्क केला. यावेळी आपल्या नातेसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध असून, आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही, या भीतीने उशिरा रात्री बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील चौधरी पेट्रोल पंपासमोर असलेल्या झाडाच्या एकाच फांदीला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती सकाळी उघडकीस येताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक हिवाळे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव, तोमर करीत आहेत.
गळफास घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या!
By admin | Published: February 17, 2016 2:18 AM