अकोला: भारतरत्न, महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची लगबग सुरू झाली होती. शहरातील चौका-चौकांमध्ये अभिवादनासाठी प्रतिमांची आरास करण्यात आली होती. संपूर्ण शहरातील वातावरण आज भीममय झाले होते. समस्त अकोलेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या अशोक वाटिका परिसरामध्ये तर महामानवांना वंदन करण्यासाठी शुक्रवारी जनसागर लोटला होता. राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महामानवांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर अशोक वाटिकेमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशोक वाटिका स्थळाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळपासूनच या ठिकाणी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. वाचनीय पुस्तके, थोरपुरुषांच्या प्रतिमा, मूर्ती, यासोबतच खाद्यपदार्थ, हार-फुलांचे स्टॉल या ठिकाणी उपलब्ध होते. विविध सामाजिक संस्थांच्यावतीने परिसरामध्ये महाप्रसाद, जलसेवा, सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. ‘जय भीम’च्या निनादासह बुद्ध वंदनेने परिसर दणाणून गेला होता. चिमुकल्या मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच भीमरायांच्या चरणी आपले श्रद्धासुमन अर्पित केले. रात्री उशिरापर्यंत अशोक वाटिका परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.
प्रज्ञासूर्याच्या अभिवादनासाठी लोटला जनसागर
By admin | Published: April 15, 2017 1:29 AM