अकोला: जिल्ह्यात ‘लम्पी स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराचा शिरकाव झाला असून, तब्बल १८ गावांमध्ये ३४१ जनावरांना लागण झाली आहे. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज झाली असून, जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, बाधीत जनावरांची संख्या वाढत असल्याने पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट व तेल्हारा तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
सद्यस्थितीत बाधित जनावरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी परिघातील प्रभावित क्षेत्रात ५७ गावे असून अशा गावांमध्ये २२ हजार २१९ जनावरे आहेत. सद्यस्थितीत प्रभावित क्षेत्रातील या सर्व जनावरांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ३५ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. आतापर्यंत ४ हजार ९३९ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून १४१ जनावरे उपचारानंतर बरेही झाले आहेत.
निपाणा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अकोला तालुक्यातील निपाणा येथे प्रत्यक्ष भेट देऊन जनावरांची पाहणी केली. तसेच पशुपालकांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शनही केले. जिल्ह्यातील अन्य भागातही पशु वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रभेटी देत आहेत व जनावरांची पाहणी तपासणी करुन पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहेत.
पशुपालकांनी माहितीसाठी १९६२ क्रमांकावर संपर्क करा
लम्पी आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण हे १ ते ५ टक्के इतके असून, पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये. तसेच आजार बाह्य किटकांद्वारे पसरत असल्याने गोठ्यांमध्ये व बाधीत जनावरावर योग्य त्या प्रमाणात औषध फवारणी करावी, बाधीत जनावरांला अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे. पशुपालकांनी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
३५ हजार लसींचा साठा उपलब्ध
जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. प्रभावित क्षेत्रातील जनावरांची संख्या २२ हजार २९१ असून जिल्ह्यात ३५ हजार लसींचा साठी उपलब्ध आहे. पुढील शक्यता लक्षात घेता लसींचा आणखी साठा मागविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.