अकोला: जिल्ह्यात गुरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना बुधवारी येथील हिंगणा रोड परिसरातील एका नर वासराला लम्पी त्वचारोगाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले आहे. तसा आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी विजय पाटील यांनी बुधवारी निर्गमित केला. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण १०० टक्के पूर्ण यावे, असे आदेश पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.
गुरांना लम्पीसदृश आजाराचे लक्षणे दिसून आल्यास त्वरित पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करावे तसेच लम्पीला रोखण्यासाठी लसीकरण पूर्ण करावे. लम्पीसंदर्भात त्वरित पशुसंवर्धन विभागाला माहिती देऊन सहकार्य करावे. पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे - डॉ. जगदीश बुकतरे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग अकोला.