अकोला - शहरातून पातूरकडे जात असलेल्या हिमालया ट्रॅव्हल्सच्या एका लक्झरी बसने अकोली खुर्द येथील दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान हॉटेल जयराज बारनजीक घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. जुने शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी येण्यास दिरंगाई केल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रत्यक्षदश्रींनी केला. आकोली खुर्द येथील रहिवासी साबळे नामक इसम त्यांच्या एम एच २८ डब्ल्यू ६५५९ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला औरंगाबाद येथील हिमालया ट्रॅव्हल्सच्या एका लक्झरीने पातूर रोडवरील जयराज बारनजीक जबर धडक दिली. या अपघातात साबळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी आरडा-ओरड केली. मात्र, या रोडवरून जाणार्या एकाही वाहनाने त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची तसदी घेतली नाही. या अपघाताची माहिती छावाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांना मिळताच त्यांनी जुने शहर पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळ गाठले. मात्र, जुने शहर पोलीस तब्बल अर्धा तासा उलटल्यावरही दाखल न झाल्याने साबळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर साबळे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात लक्झरी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
लक्झरीने दुचाकीस्वारास चिरडले
By admin | Published: June 08, 2015 1:38 AM