अकोला : जठारपेठ परिसरात रहिवासी असलेल्या एका घरातील मोलकरणीने ७ लाख ६३ हजार रुपये घरातून लंपास केले. तिची चोरी छुप्या सीसी कॅमेरात पकडल्या गेली. घरमालकाने रामदासपेठ पोलिसांना कपाटातून पैसे चोरतानाचे फुटेजही दिले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मोलकरणीला ठाण्यात आणले; मात्र गुन्हा दाखल करण्यास तब्बल १३ दिवस लागले. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. रामदासपेठमधील डीबी स्कॉडची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जठारपेठ भागातील रहिवासी असलेल्या प्रभा मंगलसिंग पाकळ यांच्याकडे दीपा सुभाष निखाडे नामक महिला घरकाम करण्यासाठी होती. अल्पावधीतच दीपाने घरातील मंडळींचा विश्वास संपादन केला. प्रभा पाकळ यांनी एक व्यवहार केला होता. यासाठी त्यांनी घरात ७ लाख ६३ हजार आणून ठेवले होते. या पैशातील रक्कम चोरी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रभा पाकळ यांनी घरात छुपे कॅमेरे लावून सत्यता पडताळणी केली असता सदरहू महिला ही घरातील कपाटातील पैशाचे बंडल चोरताना कॅमेरात सापडली. हा पुरावा घेऊन प्रभा रामदासपेठ पोलीस ठाण्यात पोहोचल्या. पोलिसांनी क्लिप बघितली आणि घरकाम करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले; मात्र १३ दिवसांनंतरसुद्धा गुन्हा दाखल झाला नाही. पैशाची वसुली नाही म्हणून प्रभा पाकळ यांनी वेळोवेळी ठाण्यात चौकशी केली असता तपास सुरू आहे, असेच उत्तर मिळाले. अखेर हे प्रकरण उपविभागीय पोलीस अधिकारी माने पाटील यांच्यापर्यंत गेले. त्यांनी विचारणा केली असता मंगळवारी १३ दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दीपा नामक महिलेस अटक करून आपली तत्परता दाखविली. प्रभा पाकळ यांच्या घरातून ७ लाख ६३ हजार रुपये चोरी गेले असताना पोलिसांनी ही रक्कम कमी करण्यास सांगितले. अखेर तक्रारीत ४ लाख ९० हजार नमूद करण्यात आले.