गजानन वाघमारे
बार्शीटाकळी: येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर रंगलाल पवार हे प्राचार्यपदावरून दि. ३० जून २०२० रोजी सेवानिवृत झाले. त्यानंतर त्यांनी प्राचार्यपदाची वयोमर्यादा ६२ वर्षांहून ६५ वर्षे करण्यासाठी सचिव, प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ, जनुना हा प्रस्ताव संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीमार्फत उच्च तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर करून प्राचार्यपदाची वयोमर्यादा ६२ वर्षांहून ६५ वर्षे करुन घेतली. त्या प्रस्तावामधील संस्था सचिव म्हणून असलेल्या स्वाक्षऱ्या व सर्व दस्तऐवज खोटे, बनावट असल्याची तक्रार प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ, जनुनाचे सचिव किसन रंगलाल पवार यांनी रविवारी दि.१ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.
सचिव किसन रंगलाल पवार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ, जनुना संचलित गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर रंगलाल पवार हे ६२ वर्षांचे झाल्याने दि. ३० जून २०२० रोजी सेवानिवृत झाले. त्यांनी प्राचार्यपदाची वयोमर्यादा ६२ वर्षांहून ६५ वर्षे मिळावी यासाठी 'सचिव, प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ, जनुना' या, नावाने प्रस्ताव संत गाडगेबाबा विद्यापीठामार्फत शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर केला. त्यानंतर प्राचार्यपदाची वयोमर्यादा ६२ वर्षांहून ६५ वर्षे मंजूर करून घेतली. आरटीआय कार्यकर्ता अविनाश किसन राठोड (रा. बार्शीटाकळी) यांनी माहिती अधिकारात उच्च तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई येथून सदर प्रस्ताव मिळविला. त्यानंतर सचिव किसन रंगलाल पवार यांना दाखविला असता 'सचिव, प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ, जनुना' या नावाने पाठवलेल्या प्रस्तावातील स्वाक्षऱ्या, सचिव पदाचा शिक्का बनावट व खोटा वापरल्याचे निदर्शनास आले. डॉ. मधुकर पवार यांनी संस्थेच्या लेटर पॅडचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून डॉ.मधुकर रंगलाल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किसन रंगलाल पवार यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
-----------------------------
चौकशी करून आठ दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश
बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव किसन पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संचालक, उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून तत्काळ कारवाई करण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आठ दिवसांत प्रस्ताव मागविला आहे.
-------------------------------
सचिव किसन रंगलाल पवार यांनी माझ्याविरुद्ध पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केलेले आरोप हे खोटे आहेत. त्यांच्यासोबत वाद सुरू असल्याने ते माझ्याविरुद्ध खोटे आरोप करीत आहेत. ज्यावेळी मी प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी कोणताही वाद नव्हता. आज वाद असल्यामुळे खोट्या तक्रारी करीत आहेत. डॉ. मधुकर रंगलाल पवार, प्राचार्य, गुलाम नबी आझाद, महाविद्यालय, बार्शीटाकळी.