शहरातील प्रत्येक गल्ली बाेळात माेकाट डुकरांनी उच्छाद मांडला आहे. मंगल कार्यालये, हाॅटेल अथवा सार्वजनिक ठिकाणी पार पडणारे लग्नसाेहळे तसेच विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी आजूबाजूला माेकाट डुकरांचे घाेळके आढळून येतात. तसेच घाण पसरवण्यास कारणीभूत ठरतात. त्यांना हाकलताना संबंधितांच्या नाकीनऊ येत असल्याची परिस्थिती आहे. मागील काही दिवसांपासून माेकाट वराहांच्या संख्येत माेठी वाढ झाली असून त्यापासून लहान मुलांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला आहे. ही समस्या दूर करण्याच्या उद्देशातून महापालिकेच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी स्थानिक वराह व्यावसायिकांना त्यांनी पालन केलेल्या वराहांचे शहराबाहेर स्थानांतरण करण्याचे निर्देश दिले हाेते. या निर्देशाकडे वराह व्यावसायिकांनी पाठ फिरवल्यामुळे प्रशासनाने कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यातील कंत्राटदाराला माेकाट वराह पकडण्याचे निर्देश दिले. या कंत्राटदाराने २४ जुलै राेजी उत्तर झाेनमधील अकाेटफैल परिसरातून २५० पेक्षा अधिक वराह पकडण्याची कारवाई केली हाेती.
उत्तर झाेनमध्ये सर्वाधिक वराह
उत्तर झाेनमधील अकाेटफैल, विजय नगर, बापू नगर, लाडीस फैल, देशमुख फैल, आपातापा राेड, घुसर राेड आदी भागात माेठ्या प्रमाणात वराह पालनाचा व्यवसाय केला जाताे. त्यानंतर पश्चिम झाेनमधील वाल्मीकी नगर, रमेश नगरमध्ये वराहपालन केले जाते. मनपाच्या कारवाईनंतर २५ जुलैपासून विजय नगर, अकाेटफैल, बापू नगर,आपातापा राेड भागातील व्यावसायिकांनी वराहांना पडकी घरे, घरामागे बांधलेल्या गाेडावूनमध्ये काेंडून ठेवण्यास सुरुवात केली आहे.
वराह व्यावसायिक मनपाच्या सेवेत
शहरातील बहुतांश सर्वच वराह व्यावसायिक मनपाच्या स्वच्छता व आराेग्य विभागात सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. सफाई कर्मचारी जीव धाेक्यात घालून साफसफाई करीत असतानाच दुसरीकडे त्यांनीच पालन केलेले वराह अस्वच्छता पसरविण्यास व आराेग्यास धाेकादायक ठरू लागले आहेत.