अकोला : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाने १२ वी नंतर तीन वर्षीय पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा कोर्स) प्रस्तावित केला आहे. परंतु राज्यभरातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा या पदविका अभ्यासक्रमाला विराेध आहे. तसेच खासगी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी माफसू सुधारणा विधेयक, २०२३ ला विद्यार्थ्यांचा विरोध असून याविरोधात अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परिणामी अकोल्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालय व पशुचिकित्सालय सेवा बंद आहे.
महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर ‘इयत्ता १२ वीच्या इंग्रजी विषयांतर्गत पशुवैद्यकीय विज्ञान विषयातील तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा) (डिप्लोमा इन वेटरनरी सायन्स) सुरू करण्याची योजना आखत आहे. याला राज्यभरातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा विराेध आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटनेंतर्गत यासाठी आंदोलन केले जात आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात भारतातील पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या इतर राज्यांच्या तुलनेत दरवर्षी मोठ्या संख्येने पदवीधर उत्तीर्ण होत असल्याने, राज्यात आधीच हजारो बेरोजगार पशुवैद्यकीय पदवीधर आहेत. शिवाय, प्रस्तावित नवीन डिप्लोमा कोर्समुळे पशुवैद्यकीय पदवीधरांमधील बेरोजगारीचे प्रमाण तर वाढेलच, शिवाय डिप्लोमाधारक हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत असा चुकीचा आभास सर्वसामान्य जनतेमध्ये आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्येही निर्माण होईल. यामुळे हे पदविकाधारक पशुवैद्यकीय शास्त्राचे आवश्यक ज्ञान न घेता शेतकरी, प्राण्यांवर उपचार करतील, याचा लाभ घेतील. यामुळे पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या सक्षमतेवर व गुणवत्तेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे प्रस्तावित पदविका अभ्यासक्रम लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी माफसूच्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही या विद्यार्थ्यांनी केला आहे.