अकोला: गत तीन दिवसांपासून महा ई-पोर्टलचे मुख्य सर्व्हर बंद पडल्याने आॅनलाइन अर्ज भरण्यापासून राज्यातील लाखो उमेदवार वंचित राहिले. तीन दिवसांपासून पोर्टल सातत्याने निकामी पडत असल्याने १६ एप्रिलच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेकांना अर्ज अपलोड करता आले नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर अखेर शासनाने २३ एप्रिल १९ पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढविली आहे.राज्याच्या जिल्हा परिषद आस्थापनेवरील १३५७० विविध पदांसाठी अर्ज मागविले होते. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथील पदांचा समावेश आहे. अधीक्षक अभियंता, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, विस्तार अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ लेखाधिकारी आदी पदांसाठी बोलाविण्यात आलेल्या आॅनलाइन अर्जांची स्वीकृती १६ एप्रिलपर्यंत होती; मात्र १४ एप्रिलपासून महा ई चे पोर्टल निकामी होत होते. त्यामुळे लाखो उमेदवारांना आॅनलाइन अर्ज दाखल करता आले नाही. काही वेळेपुरता सर्व्हर सुरू व्हायचे तर दोन-तीन तासांत एखादा अर्ज अपलोड व्हायचा. ही स्थिती राज्यभर अशीच होती. अनेकांनी यासंदर्भात तक्रारी नोंदविल्यानंतर शासनाने त्याची दखल घेतली. १६ एप्रिलच्या सायंकाळी पोर्टलवर अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढविली आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव गिरीश भालेराव यांनी ही मुदत वाढवून दिल्याचे कळविले आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता आॅनलाइन अर्ज दाखल करावे, यापुढे मुदतवाढ केली जाणार नाही, असेही या पत्रात कळविले आहे.