अकोला: भाजपला सत्तेबाहेर ठेवणे हा आमचा उद्देश असून, त्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राज्यात आगामी सर्व निवडणुका सोबत लढणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मिळून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवणे महाविकास आघाडीचा उद्देश असून, त्यासाठी आगामी सर्व निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढविणार आहेत. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडीसोबत लढविणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. यावेळी महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या.
दानवे यांची टीका राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्याचा खटाटोप: यशोमती ठाकूर
केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याच्या मुद्द्यावर पत्रकारांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया घेतली असता, रावसाहेब दानवे यांनी केलेली टीका हा तर राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्याचा खटाटोप आहे, असे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.