अकोला : राज्य बियाणे महामंडळांतर्गत कार्यरत परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेला महाराष्ट्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ नुसार, राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून मान्यता देण्यात आली. त्यामुळे अकोला पाठोपाठ आता परभणी येथील राज्य बियाणे प्रयोगशाळा राज्यातील दुसरी प्रयोगशाळा ठरणार आहे. या ठिकाणी बीज परीक्षणासह बियाण्यांचे गुणवत्ता नियंत्रण देखील शक्य होणार आहे.
परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेला राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून मान्यता मिळाल्याने आता कोणत्याही अधिसूचित वाणाच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या बियाण्यांचे परीक्षण महामंडळाच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत करता येईल. तसेच शेतकरी बांधवांना, खासगी कंपन्यांना तसेच बीज प्रमाणीकरण यंत्रणेला बियाणे नमुन्यांचे बीज परीक्षण गुणवत्ता नियंत्रण परभणी येथील प्रयोगशाळेत करणे शक्य होणार आहे. महामंडळाची प्रयोगशाळा ही राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना उच्चतम दर्जाचे गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास महाबीजचे अध्यक्ष तथा कृषी सचिव एकनाथ डवले आणि महाव्यवस्थापकीय संचालक जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला.