मूर्तिजापूर : खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची पेरणीसाठी बी-बियाणे व खते खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील कृषी केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. कृषी केंद्रांबाहेर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक कृषी केंद्रांच्या बाहेर कृषी विभागाचा कर्मचारी नेमावा व महाबीज सोयाबीन साठ्याची रोजची स्थितीची यादी कृषी केंद्राबाहेर लावण्यात यावी, अशी मागणी भाजपने उपविभागीय अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील शेतकऱ्यांची पेरणीसाठी बी-बियाणे, खते जमा करण्याची लगबग सुरू आहे. तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनामार्फत नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे; मात्र कृषी केंद्रांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रांमध्ये कृषी विभागाचा कर्मचारी नेमावा, महाबीज सोयाबीन रोजच्या साठ्याची स्थिती व पहिल्या दिवशी ज्या शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आली त्याची यादी कृषी केंद्राबाहेर लावावी, जेवढे बियाणे उपलब्ध आहे, तेवढेच टोकन शेतकऱ्यांना वाटप करावे आदी मागण्या करीत भाजप तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी आघाडीप्रमुख अनिल पाटील ठोकळ, भाजयुमो तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, राजेंद्र इंगोले यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी तसेच कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.