अकोला: महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अकोल्यातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही; मात्र जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांच्या नावांचा उल्लेख करीत उपस्थित जनसमुदायाला त्यांच्या पाठीशी आशीर्वाद कायम ठेवण्याचे साकडे घातले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला साद देत जनतेनेही हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे उमेदवारीच जाहीर केली, अशी चर्चा सुरू झाली होती.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी अकोल्यात आले होते. येथील अकोला क्रिकेट क्लबच्या मैदनावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांनी भाजपा सरकारने केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत जनतेला पुन्हा जनादेश देण्याचे आवाहन केले. यावेळी मंचावर कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार सूरजसिंह ठाकूर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला जो जनादेश दिला होता तो सार्थ ठरविला आहे. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही डाग आमच्या सरकारवर नाही. गेल्या पाच वर्षात विकास कामांचा उच्चांक गाठला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कुपोषण निर्मूलन, रस्ते विकास अशा अनेक आघाड्यांवर राज्याचे स्थान देशात अव्वल झाले आहे. अकोल्यासाठी १६३ कोटी रुपये खर्चाचा उड्डाण पूल, १५० कोटी खर्चाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ५० कोटी रुपये खर्चाचे तापडिया नगरमधील रेल्वे क्रॉसिंग, ३० कोटी रुपयांचे सांस्कृतिक भवन, रस्त्यांचा अनुशेष संपला, सिंचनासाठी निधी दिला, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत अकोल्याचा समावेश, रस्ते विकासासाठी ५११ कोटी अशा अनेक विकासाची कामे केली आहेत. अजूनही राज्याला प्रगतीवर न्यायचे आहे. त्यासाठीच जनादेश मागण्याकरिता तुमच्यापर्यंत आलो आहे. येथील आमदारांना तुमचा जनादेश आहे का, असा सवाल जनतेला विचारून हात उंचावून प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रत्येक आमदाराचे नाव घेऊन त्यांनी जनतेचा कौल मागितल्याने सभास्थळीच आमदारांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून आले.आ. शर्मा म्हणाले; हमारा भरोसा नही!आमदार गोवर्धन शर्मा यांनी मनोगत व्यक्त करताना ‘हमारा कोई भरोसा नही’, रणधीर भाऊंच्या पाठीशी राहा, असे उद्गार काढल्याने सभेत एकच हास्यकल्लोळ उडाला. गेल्या पाच टर्मपासून आ. शर्मा हे सातत्याने विजयी होत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरू होते; मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन ते भाजपाच्या पारड्यात विजयश्री खेचून आणतात. त्यामुळेच त्यांच्या या जाहीर उद्गारामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणारलहान विमानतळांचा विस्तार करून विमानप्रवास सर्वसमान्यांच्या आवाक्यात आणण्याचे धोरण केंद्र शासनाने हाती घेतले आहे. त्यामध्ये अकोल्याच्या विमानतळाचाही समावेश आहे. येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल, तुम्ही काळजी करू नका, असे आश्वस्त करत अकोल्यातून प्रवासी वाहतूक सुरू करून हवाई स्लीपर घालणाराही हवाई सफर करू शकेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानतळ विस्तारीकरणानंतर उद्योगांचाही विस्तार होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.मतदान जनता करते इव्हीएम नाहीइव्हीएमच्य मुद्यावर सर्व विरोधक एकत्र आले आहेत. त्यांची मुख्यमंत्र्यानी खिल्ली उडविली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे जिंकल्या तर इव्हीएम चांगली अन् अकोल्यात संजय धोत्रे विजय झाले तर इव्हीएम वाईट हे कसे काय? असा प्रश्न उपस्थित करून मतदान जनता करते इव्हीएम नाही असे स्पष्ट करीत विरोधकांनी जनतेच्या प्रश्नावर एकत्र यावे असा सल्लाही त्यांनी दिला.पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुक्काम रद्दराज्यात पूर परिस्थितीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अकोल्यातील मंगळवारचा मुक्काम रद्द करून तातडीने नागपूरकडे प्रयाण केले. नागपूर येथून ते मुंबईला जाणार असून, बुधवारी सकाळी पूर स्थितीची माहिती घेऊन प्रशासनाला उपाययोजनांबाबत निर्देश देणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी बाळापूर येथे होणारा स्वागत सोहळा रद्द करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री थेट शेगावात पोहचणार असून, तेथून महाजनादेश यात्रा पूर्वनियोजित स्थळी जाणार आहे.अकोल्यातील शेतकऱ्यांना ६०० कोटीची कर्ज माफीभाजपा सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना राबविली असून, अकोल्यातील शेतकºयांना कर्जमाफीसाठी ६०० कोटीचा निधी देण्यात आला आहे. शेवटच्या शेतकºयाचे कर्ज माफ होईपर्यंत ही योजना सुरू राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महाजनादेश यात्रा ही जनतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी यात्रा असून, भाजपा सरकारने सुरू केलेल्या विकास पर्वाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणारी यात्रा असल्याचे सांगितले.