महापालिकेच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवरील कचरा हटविण्यासाठी पाेकलेन मशीनच्या देयकावर काेट्यवधींची उधळपट्टी हाेत असल्याची बाब समाेर आल्यानंतर मुदतवाढीवर बाेट ठेवले. काही प्रभावी राजकारण्यांसह अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या नकाशा मंजुरीच्या फायली नियमबाह्य असल्याचे नमूद करीत त्या नियमानुसार सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, मालमत्ता करावर आकारल्या जाणाऱ्या दाेन टक्के शास्तीच्या दंडात्मक रकमेतून सूट मिळावी, यासाठी १४ जून राेजीच्या विशेष सभेत शास्ती अभय याेजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांनी मांडला असता त्याला महापाैर अर्चना मसने यांनी मंजुरी दिली हाेती. हा प्रस्ताव आयुक्तांनी फेटाळल्याचे समाेर आले.
सत्ताधाऱ्यांवर पुन्हा कुरघाेडी
प्रभारी आयुक्त अराेरा यांनी शास्ती अभय याेजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर कुरघाेडी केल्याचे समाेर आले आहे. आयुक्तांची ठाम भूमिका पाहता महापाैर मसने यांनी एक पाऊल मागे घेत अकाेलेकरांना ३१ जुलैपर्यंत शास्ती अभय याेजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले, हे येथे उल्लेखनीय.
अकाेलेकरांना १ काेटी रुपयांचा दिलासा
शहरातील सुमारे ३ हजार २०० मालमत्ताधारकांनी शास्ती अभय याेजनेचा लाभ घेतला. यामुळे संबंधितांना १ काेटी रुपयांचा दिलासा मिळाला आहे. उर्वरित तीन दिवसांत किती जण याेजनेचा लाभ घेतात, की याेजनेला पुन्हा मुदतवाढ मिळते, याकडे अकाेलेकरांचे लक्ष लागले आहे.