अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदानाकरिता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) सोमवारी मतपत्रिका लावून ‘सील’ लावण्यात आले असून, मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रशासनामार्फत मतदान प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आली आहे. त्यामध्ये सोमवार १४ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामात अकोला पूर्व विधानसभा मतदासंघातील मतदान प्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) मतपत्रिका लावण्यात आल्या व ‘सील’ लावून मतदान यंत्र गोदामात ठेवण्यात आले. निवडणूक निरीक्षकांसह अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांवर मतपत्रिका लावून ‘सील’ लावण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.