अकोला: विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघात भाजपा, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस तीन राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. त्यामध्ये बाजी मारण्याकरिता आवश्यक असलेली निर्णायक मते मिळविण्यासाठी तिन्ही राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आटापिटा करावा लागत आहे.अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार रणधीर सावकर, वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे व काँग्रेसचे विवेक पारसकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. यापूर्वी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा, भारिप-बमसं आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये भाजपाचा निसटता विजय झाला होता. यावेळी भाजपा-शिवसेना युती असल्याने, मतदारसंघात भाजपा, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. भाजपा-सेना युतीमुळे भाजपाच्या मतांमध्ये भर पडणार असली तरी, मतांच्या विभाजनात विजयासाठी आवश्यक असलेली निर्णायक मते मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे परंपरागत गठ्ठा मतांच्या व्यतिरिक्त मिळणाऱ्या मतावरच या मतदारसंघातील तिरंगी लढतीतील उमेदवारांच्या जय-पराजयाचे राजकारण अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने मतदारसंघातील मतांच्या विभाजनात विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळविण्याकरिता भाजपा, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारांकडून आटापिटा करण्यात येत आहे. त्यामध्ये निर्णायक मते घेण्यात कोण बाजी मारणार, याकडे मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.‘त्या’ मतांकडे लागले लक्ष!२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना ३५ हजार ५१४ मते मिळाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना युती असल्याने, गेल्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेली मते भाजपाला मिळणार असल्याने, भाजपाच्या मतांमध्ये भर पडणार आहे; मात्र मतांचे विभाजन झाल्यास त्यापैकी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसला किती मते मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.