Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:14 PM2019-10-22T12:14:35+5:302019-10-22T12:14:41+5:30
काँग्रेसच्यावतीने साजिद खान पठाण तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मदन भरगड यांच्या दावेदारीमुळे यंदाची निवडणूक त्रिशंकू होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतांचे विभाजन झाल्याची चर्चा आहे. यामध्ये प्रामुख्याने जुने शहरातील डाबकी रोड, बाळापूर रोड, हरिहरपेठ, सोनटक्के प्लॉट, गुलजारपुरा, पोळा चौक आदी परिसराचा समावेश आहे. संबंधित भागातील मतदान केंद्रावर मतदारांची उसळलेली गर्दी व डाबकी रोड भागातील मतदान केंद्रावरील शुकशुकाट पाहता काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसून आले. तर भाजप व वंचित बहुजन आघाडीचे निकालाकडे लक्ष लागल्याचे चित्र आहे.
विधानसभा मतदारसंघाचे मैदान काबीज करण्यासाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून प्रचारात रंगत निर्माण केली होती. भाजपच्यावतीने सलग सहाव्यांदा गोवर्धन शर्मा निवडणूक रिंगणात होते. काँग्रेसच्यावतीने साजिद खान पठाण तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मदन भरगड यांच्या दावेदारीमुळे यंदाची निवडणूक त्रिशंकू होईल, यावर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असता, जुने शहरातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानालगतची मनपा मुलांची शाळा क्र. १०, मनपा मुलांची शाळा क्रमांक १, बाळापूर रोडवरील मनपा मुलांची शाळा क्र. १७, हरिहरपेठमधील मनपा मुलांची शाळा क्र. १९, शिवाजी टाऊन, पोळा चौकातील मनपा उर्दू मुलांची शाळा आदी ठिकाणच्या मतदान केंद्रात महिलांची गर्दी उसळल्याचे चित्र होते. संबंधित मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ नंतरही मतदारांची गर्दी कायम होती. नेमके त्याउलट चित्र डाबकी रोड परिसरातील खासगी शाळा, महाविद्यालयात दिसून आले. संबंधित शाळा, महाविद्यालयांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ ३३ टक्के मतदान झाल्याचे चित्र होते.
हक्क बजावण्यासाठी महिलांचा पुढाकार
पश्चिम मतदारसंघातील हरिहरपेठ, पोळा चौक, बाळापूर रोड, गुलजार पूरा, भिम नगर, खैदमोहम्मद प्लॉट, हमजा प्लॉट, चाँदखा प्लॉट, अकोट फैल, नायगाव आदी परिसरातील मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिला मतदारांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. मतदान जनजागृतीमुळे महिलांनी पुढाकार घेतल्याचे बोलल्या जात आहे.