बाळापूर: मतदारसंघामध्ये भाजप-सेना युती, काँग्रेस-राकाँ महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांमध्ये सोमवारी मतदानाच्या दिवशी काट्याची चौरंगी लढत पाहावयास मिळाली. आता बाळापूर मतदारसंघात परिवर्तन होणार की ही जागा वंचित बहुजन आघाडी कायम राखणार, हे २४ आॅक्टोबर रोजी मतपेटीतून दिसून येईलच. या मतदारसंघामध्ये एमआयएमच्या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभाजनाचा काँग्रेस-राकाँला फटका बसणार असल्याची चर्चा आहे.बाळापूर मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांनी प्रथमच नवे उमेदवार रिंगणात उतरविले. दहा वर्षांपासून हा मतदारसंघ भारिप-बमसं (वंचित बहुजन आघाडी)च्या ताब्यात आहे. यंदा भाजपच्या वाट्याची ही जागा सेनेला सुटली आणि सेनेने जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा बाळापूर मतदारसंघ प्र्रतिष्ठेचा करीत, काँग्रेसकडून ही जागा खेचून आणली. राकाँने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीने विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांचे तिकीट कापून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना संधी देत, मराठा कार्ड खेळले. ऐनवेळी वंचितमधून बाहेर पडलेले डॉ. रहेमान खान यांनी प्रथम एमआयएमचा झेंडा हाती घेत, निवडणूक प्रतिष्ठेची केली. सोमवारी झालेल्या मतदानामध्ये नव्या दमाचे उमेदवार रिंगणात असल्याने, मतदारांमध्येसुद्धा उत्साह दिसून आला. मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर जात मतदारांनी मतदान करून कर्तव्य बजावले. चारही राजकीय पक्षांमध्ये सोमवारी चांगलीच चुरस बघायला मिळाली. बाळापूर मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाल्यामुळे उमेदवारही खुशीत दिसत होते. चारही राजकीय पक्षांचे उमेदवार तगडे असल्यामुळे त्यांचा विजय होणार असल्याचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत. चौरंगी लढतीमुळे निवडणुकीचा काय निकाल लागेल, हे सांगणे कठीण असले तरी, अंदाजानुसार उमेदवार विजय आपलाच होणार असल्याचा दावा करीत आहेत. भाजपला ही जागा न सुटल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेना उमेदवाराच्या प्रचारात दिसून आले नाहीत. त्याचा फटका सेनेला बसू शकतो. एमआयएममुळे मुस्लीम मतांचे विभाजन कोणाच्या पथ्थ्यावर पडते तसेच अखेरच्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस-राकाँ उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीने जनसंपर्क, जातीय समीकरणावर भर देत, चांगलीच चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता या मतदारसंघात परिवर्तन होणार की वंचित ही जागा कायम राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.