अकोला : संविधान निर्माता महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना काॅंग्रेसने वारंवार अपमानीत केले असून, देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून बाबासाहेबांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले; मात्र त्याचे श्रेय काॅंग्रेसने बाबासाहेबांना दिले नाही, असा आरोप करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे टीकास्त्र सोडले. विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील मैदानावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न केव्हा मिळाला, असा सवाल करीत केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार असतानाच बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. यासोबतच डाॅ. बाबासाहेब जिथे-जिथे गेले आणि राहिले, तिथे-तिथे पंचतीर्थस्थान घोषित करण्यात आले असून, ही पंचतीर्थस्थाने भावी पिढीला प्रेरित करणार करणार आहेत; मात्र या पंचतीर्थांना शाही परिवारातील कोणताही सदस्य आजपर्यंत भेट देऊन आला नाही, असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला.
या सभेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, खासदार अनुप धोत्रे, आ. संजय कुटे, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. हरीश पिंपळे, आ. अमोल मिटकरी, शिंदेसेना नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार बळीराम सिरस्कार, आ. आकाश फुंडकर, विजय अग्रवाल, संदीप पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने आदी उपस्थित होते.
निवडणुका महाराष्ट्रात; काँग्रेसची वसुली कर्नाटकात
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक हाेत असली तरी काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात या राज्यांमध्ये वसुली करून तो पैसा राज्यातील निवडणुकीसाठी वापरला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कर्नाटकमधून मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार येते ते राज्य शाही परिवाराचे एटीएम होत असल्याची टीकाही त्यांनी केली.