- राजेश शेगोकार
अकोला : २०१९ या सरत्या वर्षाने राजकारणात मोठी उलथापालथ घडविली. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस असे तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार सोमवारी झाला. यामध्ये अकोल्याची पाटी कोरीच राहिल्याने नव्या वर्षात अकोल्याला आयात पालकमंत्री मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.अकोल्यातील पाचपैकी चार जागा भाजपने जिंकलेल्या असून, शिवसेनेने बाळापूर ही एकमेव जागा जिंकली आहे. शिवसेनेचे आ. गोपीकिशन बाजोरिया हे सर्वात ज्येष्ठ आमदार असून, त्यांचे पुत्र विल्पव हे सुद्धा हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत. बाजोरिया हे मंत्रिपदासाठी शिवसेनेत सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत. ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असल्याने पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात तसेच त्यांची मातोश्रीसोबत असलेली जवळीक लक्षात घेता त्यांची वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. शिवसेनेच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात नव्या नेतृत्वालाही संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्या अनुषंगाने पहिल्यांदाच विजयी झालेले आमदार नितीन देशमुख यांनाही संधी मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांना होती; मात्र सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अकोल्याची पाटी कोरीच राहिली आहे. विशेष म्हणजे आ. बाजोरिया यांनी शपथविधी सोहळ्याला दांडी मारून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड यांच्या समवेत शपथविधीचा सोहळा दूरचित्रवाणीवर बघितला. त्यावरून पश्चिम वºहाडातील आमदारांची नाराजी स्पष्ट झाली आहे. बच्चू कडू यांच्यावर येऊ शकते पालकत्वाची जबाबदारीशिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले आमदार बच्चू कडू यांच्यावर अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता राजकीय वर्तृळात व्यक्त केली जात आहे. बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्याचे असून, तेथील आमदार यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. साहजिकच त्या अमरावतीच्या पालकमंत्री पदावर राहतील त्यामुळे ना. कडू यांना नजीकच्या अकोल्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ना. कडू यांची प्रहार संघटना अकोल्यातही प्रभावी असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेली आहे. त्यामुळे ना. कडू यांनाही अकोला रजाकीय दृष्टीने सोयीचे ठरण्याची शक्यता आहे.