अकोला : विविध दलांचे शानदार पथसंचलन, राष्ट्रगीत व राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’चे आसमंतभर निनादणारे सूर आणि वीरमाता, वीरपत्नी व मान्यवरांची उपस्थिती अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात अकोला शहरातील लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर बुधवार, १ मे रोजी साजरा करण्यात आला. प्रारंभी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रसेवेसाठी प्राणांची बाजी लावणा-या व शौर्य गाजविणा-या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांचे कुटुंबिय, वीरमाता, वीरपत्नी सोहळ्याला उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कुंभार यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिका-यांनी उघड्या जीपमधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर जिल्हा पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, महिला पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन दल आदी पथकांनी शानदार पथसंचलन केले. परेड कमांडर गणेश जुमनाके, सेकंड परेड कमांडर गोविंद साबळे, पीएसआय संदीप बलोदे, निता दामधर, चतरसिंग सोळंके, विजयसिंग डाबेराव व नीलेश गाडगे आदींनी विविध पथकांचे नेतृत्व केले.
पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सुनील पवार, काझी मोहम्मद फजलुर रहेमान, विनय जाधव, अनिल टोपकर, सतीश फोकमारे, ज्ञानेश्वर सैरिसे, अ. फईम शेख चांद, सुनील राऊत, मंगेश महल्ले, विलास बंकावार, साजिद खालिक अब्दुल आदींना यावेळी गौरविण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त रवीशंकर पाली यांचाही गौरव करण्यात आला. नीलेश गाडगे यांनी या शानदार सोहळ्याचे संचालन केले.