- राजेश शेगोकार
अकोला: पश्चिम वऱ्हाडाच्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६५ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता १६९ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. बुलडाण्यात भाजप, अकोट व वाशिममध्ये शिवसेना तर रिसोड मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४ उमेदवार असून, अकोल्याच्या अकोट मतदारसंघात सर्वाधिक १७ उमेदवार आहेत.अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ३३ उमेदवारांनी माघार घेतली असून, ६८ उमेदवार रिंगणात कायम आहेत. अकोट मतदारसंघात शिवसेनेचे अनिल गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने येथे युतीमध्ये बंडखोरी झाली आहे. गावंडे यांनी महिनाभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश घेतला होता. ही एकमेव बंडखोरी वगळता उर्वरित चारही मतदारसंघात दिग्गजांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी मंत्री डॉ.डी.एम. भांडे, डॉ. संतोष हुशे आदींचा समावेश आहे. अकोला पश्चिममध्ये सर्वात कमी ९ तर अकोटमध्ये सर्वाधिक १७ उमेदवार रिंगणात असून, अकोला पूर्व १३, बाळापूर १५ व मूर्तिजापूर मतदारसंघात १४ उमेदवार कायम आहेत.वाशिममधील तीन मतदारसंघात १६ उमेदवारांनी माघार घेतली असून, ४२ उमेदवार रिंगणात आहेत. येथे वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर शशिकांत पेंढारकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात कायम असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी रिसोड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे.बुलडाण्याच्या सात मतदारसंघातून १६ उमेदवारांनी माघार घेतली असून, ५९ उमेदवार रिंगणात आहेत. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने सात उमेदवार कायम असून, येथे भाजपाचे नेते योगेंद्र गोडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४ उमेदवार असून, सर्वाधिक ११ उमेदवार मलकापूर मतदारसंघात आहेत.