अकोला : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ३ आॅक्टोबर रोजी अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम व अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांत ३४ उमेदवारांचे ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार, ४ आॅक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे.जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वाटप व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. गत २८ व २९ सप्टेंबर रोजी दोन दिवसांच्या शासकीय सुटीनंतर ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी (१ आॅक्टोबर रोजी) अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम व अकोला पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांत सात उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. २ आॅक्टोबर रोजी शासकीय सुटीनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी (३ आॅक्टोबर रोजी) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत ३४ उमेदवारांनी ४५ उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस शुक्रवार, ४ आॅक्टोबर रोजी असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.उमेदवारी अर्ज दाखल केलेले असे आहेत उमेदवार!अकोला पश्चिम मतदारसंघ : गोवर्धन शर्मा -भाजपा, जगन्नाथ मेश्राम -अपक्ष, रेखा घरडे -अपक्ष, शेरखान साहेबखान -टिपू सुलतान पार्टी, सुमन तिरपुडे -पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रॅटिक).अकोला पूर्व मतदारसंघ : रणधीर सावरकर -भाजपा, प्रीती सदांशिव -रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सोशल), सुधाकर पवार -अपक्ष, निखिल भोंडे -पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोकॅ्रटिक), डॉ. दशरथ भांडे -अपक्ष, हनिफ रसूल शेख -अपक्ष.