Maharashtra Election 2019 : बाळापूरात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते नाराज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:46 PM2019-10-04T13:46:33+5:302019-10-04T13:46:40+5:30
अखेर काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केल्याने, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.
-नितीन गव्हाळे
अकोला: बाळापूर काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असल्याने, येथून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांनी लढण्याची तयारी केली होती; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम गावंडे यांच्यासाठी बाळापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे बाळापूर मतदारसंघाबाबत तिढा निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केल्याने, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे प्रकाश तायडे यांनी गुरुवारी अर्ज भरल्याने येथे बंडखोरीची शक्यता आहे..
बाळापूर मतदारसंघ १९६१ ते १९८५ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. १९९0 मध्ये प्रथमच भाजप येथून विजयी झाली. त्यानंतर लक्ष्मणराव तायडे यांनी पुन्हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांनीसुद्धा येथून बाजी मारली होती. लक्ष्मणराव तायडे, गव्हाणकर, सिरस्कार यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरण जुळवून विजय खेचून आणण्याच्या इराद्याने काँग्रेस ताकदीने मैदानात उतरली होती. या मतदारसंघात मुस्लीम, माळी समाजाची निर्णायक मते असल्यामुळे प्रकाश तायडे, नातिकोद्दीन खतिब येथून उमेदवारी आग्रही होते. या इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग केले होते. वंचित बहुजन आघाडी, सेना-भाजप युतीच्या उमेदवारांचेसुद्धा काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. परंतु बुधवारी उशिरा रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना उमेदवारी जाहिर झाल्याने काँग्रेसला या मतदारासंघावरच पाणी सोडावे लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रकाश तायडे यांनी गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तायडे यांनी दोन वर्षांपासून मतदारसंघाची बांधणी केली होती. गावोगावी सभा घेऊन त्यांनी संपर्क सुरू केला होता; परंतु आघाडीत ही जागा राकाँला गेल्यामुळे काँग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. आता काँग्रेस आघाडी धर्म पाळते की आणखी बंडखोरीची भूमिका घेते. हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
संग्राम गावंडे यांना काढावी लागेल समजूत
बाळापूर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संग्राम गावंडे यांना ही जागा सोडल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. निवडणुकीत काँग्रेसची ही नाराजी संग्राम गावंडे यांच्यासाठी लाभाची नाही. त्यासाठी त्यांना काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, नेते, पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यांची समजूत काढावी लागणार आहे.