- राजेश शेगोकार
अकोला: जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल ईव्हीएममध्ये बंद झाला. सोमवारी संघ्याकाळापासून विजयाचे दावे- प्रतिदावे, हा गट त्यांना अन् त्या समाजात यांना मतदान झाल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेला मतदानाच्या टक्केवारीची फोडणी बसल्याने गेल्या दोन निवडणुकीची तुलना करून अंदाज व आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे विजय कोणाचा, हे २४ आॅक्टोबर रोजी बाहेर येणार असले तरी प्रत्येक मतदारसंघातील विजय हा ऐतिहासिकच ठरणार आहे.
मूर्तिजापूर : हॅटट्रिक साधणार का? महिला उमेदवारालाही संधीमूर्तिजापूर मतदारसंघाने सलग तिसऱ्यांदा कोणालाही संधी दिलेली नाही त्यामुळे यावेळी हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या आ. हरीश पिंपळे यांना संधी मिळणार की हुकणार, यावर इतिहास घडेल. या मतदारसंघाचे १९६२ मध्ये कुसुमताई कोरपे, १९७२ मध्ये प्रतिभाताई तिडके या दोन महिला आमदारांनी प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी वंचितने प्रतिभा अवचार यांच्या रूपाने सक्षम आव्हान दिले आहे. त्यामुळे त्याचा विजय झाला तर तोही इतिहास ठरेल. अकोला पश्चिम: डबल हॅटट्रिक की धक्कादायक!अकोला पश्चिम हा गेल्या २५ वर्षापासून भाजपाचा गड आहे. गोवर्धन शर्मा यांच्या रूपाने या गडाला जमिनीवरचा गडकरी लाभला असल्याने भाजपाला येथे पराभूत करणे विरोधकांना शक्य झाले नाही. यावेळी शर्मा हे सहाव्यांदा रिंगणात आहेत. ते विजयी झाले तर डबल हॅटट्रिक करणारे ते पश्चिम विदर्भातील पहिले आमदार ठरतील अन् एक विक्रम त्यांच्या नावावर जमा होईल. या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी, मुस्लीम समाजाचे एकगठ्ठा मतदान यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, काँग्रेसलाही संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा वंचित आघाडीने विजय मिळविला तर या विजयाची इतिहास म्हणून नोंद तर होईलच. बाळापूर : आमदाराची हॅटट्रिक हुकली, नवा चेहराबाळापूर मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराला हॅटट्रिकची संधी मिळाली नाही. ती संधी यावेळी बळीराम सिरस्कारांना होती; मात्र त्यांची उमेदवारी कापल्यामुळे ‘हॅटट्रिक नाही’ हा इतिहास पुन्हा एकदा घडला; मात्र यावेळी विजय कोणाचीही झाला तर तो ऐतिहासिक ठरेल. वंचित बहुजन आघाडीचा विजय झाला तर या नव्या पक्षाला बाळापूरचा पहिला आमदार, शिवसेना किंवा राष्टÑवादी जिंकली तर या दोन्ही पक्षाला पहिल्यांदा विजयाची संधी अन् एमआयएम जिंकले तर या मतदारसंघातून विधानसभेत जाणारे पहिले मुस्लीम आमदार म्हणून ऐतिहासिक नोंद होईल. अकोला पूर्व: दुसऱ्यांदा आमदार की ब्रेक के बाद संधी?अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीचा बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर केवळ नीळकं ठ सपकाळ आणि हरिदास भदे या दोघांनाच दोन वेळा विजयाची संधी मिळालेली आहे. यावेळी भाजपाचे रणधीर सावरकर व वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे पुन्हा रिंगणात आहेत. आ. सावरकर जिंकले तर दुसºयांदा संधी मिळालेले ते तिसरे आमदार ठरतील. जर हरिदास भदे विजयी झाले तर ब्रेक के बाद पुन्हा संधी मिळणारे ते एकमेव आमदार म्हणून इतिहास घडवतील. अकोट : सलग दुसऱ्यांदा आमदार की दरवेळी नवा आमदार?अकोट मतदारसंघात १९६२ व १९६७ या सलग दोन टर्ममध्ये आबासाहेब खेडकर हे आमदार होते. त्यांच्यानंतर सलग दुसºयांदा आमदार होण्याची संधी या मतदारसंघाने कुणालाही दिलेली नाही. सुधाकरराव गणगणे व बाळासाहेब तायडे हे दोन वेळा आमदार होते; मात्र त्यांच्या कार्यकाळात ब्रेक होता. त्यामुळे यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळविला तर तो इतिहास ठरेल. जर भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस, वंचित किंवा अपक्षाने बाजी मारली तर दरवेळी आमदार बदलणारा मतदारसंघ हा आकोटचा लौकिक कायम राहील.